वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सेनेच्या तृप्ती सावंत यांच्याशी सामना करण्यासाठी काँग्रेसने नारायण राणे नावाचा दिग्गज मोहरा पणाला लावल्याने निर्माण झालेली चुरस मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच आटोपली. दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्याने राणे यांचे भवितव्य स्पष्ट होऊ लागले आणि मातोश्रीच्या अंगणात शिवसैनिकांचा जल्लोष सुरू झाला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे अगोदरच खचलेली काँग्रेस आणि त्यात शिवसेनेचा कट्टर शत्रू असलेले नारायण राणे यांची उमेदवारी यांमुळे मतदारसंघातील शिवसैनिकांनी सारे कसब पणाला लावून लढविलेल्या या निवडणुकीचे अपेक्षित परिणाम दिसू लागताच, भगवे झेंडे फडकू लागले. फटाके आणि घोषणांची आतषबाजी सुरू झाली, ढोल ताशे वाजू लागले आणि गळ्याभोवती भगव्या पट्टय़ा गुंडाळलेले शिवसैनिकांचे थवे उत्साहाने रस्त्यावर उतरले. नारायण राणे यांच्याविरुद्धचा संताप घोषणांमधून ऊतू जाऊ लागला, आणि वांद्रे मतदारसंघात काहीसा तणाव पसरण्याची चिन्हे दिसू लागताच पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्यास सुरुवात केली.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत राणे यांची पीछेहाट होत होती, तर तृप्ती सावंत यांच्या आघाडीत भरघोस भर पडत होती. त्यामुळे शिवसैनिक उत्साहाने अक्षरश भारावून गेले होते. ढोल ताशांच्या गजरात, शिवसैनिकांचे जमाव भगव्या झेंडय़ांबरोबरच पांढऱ्या कोंबडय़ांच्या तंगडय़ा धरून त्या हवेत उंचावत होते. काहींनी पांढऱ्या कोंबडय़ा हवेत भिरकावल्या, आणि राणे यांच्याबद्दलच्या संतापाला वाट करून दिली. अनेक शिवसैनिक, चप्पल-बूट उंचावून राणेविरोधी घोषणा देऊ लागले, आणि फटाक्यांच्या माळा दुमदुमू लागल्या. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीच्या अंगणात गर्दी केली, आणि विजयोत्सव सुरू झाला. भगव्या साडय़ा परिधान केलेल्या महिला नाचता नाचता घोषणा देऊ लागल्या.. नारायण राणे यांच्यासारख्या एका वजनदार नेत्याला एका नवख्या महिलेकडून पराभव पत्करावा लागल्याने, महिलांच्या घोषणांचा आवाज काहीसा उंचावलेलाच होता. ‘एक नारी, नाऱ्याला भारी’ अशा घोषणा देणाऱ्या महिलांनादेखील राणे यांच्याबद्दलची आपली नाराजी लपविता येत नव्हती.
मातोश्रीच्या अंगणात असा विजयाचा जल्लोष सुरू असताना, काही शिवसैनिकांनी आपला मोर्चा जुहू परिसरातील नारायण राणे यांच्या निवासी इमारतीकडे वळविला, आणि तेथेही घोषणाबाजी सुरू केली. राणे समर्थकांचे गटही तेथे दाखल झालेले होते. शिवसैनिक आणि राणेसमर्थक समोरासमोर आल्याने तणाव पसरण्याची चिन्हे दिसू लागताच पोलिसांनी तातडीने राणे यांच्या घराभोवतीचा बंदोबस्त वाढविला, शिवसैनिकांनी आणलेल्या फटाक्यांच्या माळाही ताब्यात घेतल्या, आणि आमने-सामने आलेले राणे समर्थक व शिवसैनिकांना पांगविण्याचे प्रयत्न सुरू केले. तरीही राणेविरोधी घोषणाबाजी सुरूच होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे, ‘राडा’ मात्र टळला. स्वतच्या चेहऱ्यावर वाघाचे मुखवटे रंगविलेले अनेक शिवसैनिक जिवंत कोंबडय़ा हातात घेऊन फिरताना दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राणे यांच्या पराभवाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर किंवा राज्यातील आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरचा शपथविधीच्या वेळीदेखील दिसला नाही एवढा उत्साह आणि जल्लोष या  एका विजयाने शिवसैनिकांमध्ये संचारला.

कोंबडी आणि वाघ..
राणे यांचा पराभव स्पष्ट होऊ लागल्यानंतर, वाघाचे मुखवटे धारण केलेले शिवसैनिक जिवंत कोंबडय़ा हवेत उंचावताना दिसू लागल्याने, हा काय प्रकार आहे, हे सामान्य नागरिकांना कळतच नव्हते. काही वेळाने सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विजयाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली, आणि या कोंबडी प्रकरणाचा उलगडा झाला. राणे यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे आणि आपला कोंबडय़ा विकण्याचा जुना धंदा पुन्हा सुरू करावा, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला, तेव्हा राणे यांचा पराजय आणि हवेत उंचावलेल्या कोंबडय़ा यांचे संदर्भ स्पष्ट झाले..

महिला आघाडीत उत्साह
दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांच्या विजयामुळे शिवसेनेच्या महिलांमध्ये अमाप उत्साह ओसंडत होता. मातोश्रीसमोर जमलेल्या महिलांनी ढोल ताशांच्या तालावर नृत्याचा ठेका धरला, आणि राणे यांच्यावर यथेच्छ टीका करीत, घोषणाबाजीही सुरू केली. मराठी माणूस भडकला, भगवा झेंडा फडकला, ही घोषणा या विजयानंतर खूप वेळ मातोश्रीच्या अंगणात दुमदुमत राहिली..