गेल्या काही दिवसांपासून सरकारमध्ये असूनही भाजपकडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीमुळे नाराज असलेल्या शिवसेनेला खूष करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य रस्ते विकास महामंडळास १९०० कोटी रुपयांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाचा प्रकल्प आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सोपवण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीत युती संपुष्टात आल्यापासून संधी मिळेल तेथे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची मोहीम भाजपाकडून पद्धतशीरपणे राबविली जात आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्तेत भागीदार असूनही शिवसेनेच्या पदरी दुय्यम वागणूक मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ असलेल्या शिवसेनेने आता संधी मिळताच भूसंपादन विधेयकास विरोध करीत हिशेब चुकता करण्यास सुरूवात केली आहे. एवढेच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळातही शिवसेनेकडून भाजपाची कोंडी केली जात आहे. मात्र शिवसेनेची ही आक्रमता मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील एकनाथ शिंदे यांच्याशी सलगी वाढवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण, वाशी येथे ठाणे खाडीवर नवीन सहा पदरी पूल, घोडबंदर रोड येथे उन्नत मार्ग, पुणे िरगरोड, नागपूर-औरंगाबाद-सिन्नर-घोटी रस्त्याचे चौपदरीकरण, दिघी पोर्ट-माणगाव-मुळशी-पुणे रस्त्याचे चौपदरीकरण, मुंबई-पुणे दरम्यान द्रुतगती मार्गालगत स्मार्ट सिटी उभारणी अशा ‘एमएसआरडीसी’च्या प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला.