मराठमोळ्या खाद्यपदार्थाकरिता प्रसिद्ध असलेले दादरचे प्रसिद्ध ‘आस्वाद’ उपाहारगृह लवकरच शिवाजी पार्कचा परिसर सोडून दादरमध्येच पोर्तुगीज चर्च परिसरात स्थलांतरित होणार आहे. गेली ३० वर्षे खवय्यांची खाद्यतृष्णा भागविणारे आस्वाद नोव्हेंबरनंतर तीन वर्षांसाठी शिवाजी पार्क परिसरापासून दुरावणार आहे. मात्र, पोर्तुगीज चर्चजवळील परिसरात नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.

तीन वर्षांनी पुन्हा आस्वाद शिवाजी पार्क परिसरात स्थिरावणार असल्याचे आस्वादचे मालक सूर्यकांत सरजोशी यांनी सांगितले. यावेळी आस्वादच्या व्यवस्थापनात सुधारणा होतील आणि ग्राहकांना अनेक नव्या गोष्टी अनुभवता येणार आहे. शिवाजी पार्कात फिरायला येणारे, दादर भागात खरेदी करायला येणारे कायमच आस्वादमध्ये खाण्यासाठी येत असतात, तर जवळच कीर्ती आणि रूपारेल महाविद्यालय असल्यामुळे येथे कायम तरुणांची गर्दी असते. मात्र जागेअभावी अनेकदा ग्राहकांना रांगेत उभे राहावे लागत. यासाठी अनेकदा ग्राहकांकडून उपाहारगृहाची जागा वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र पोर्तुगीज चर्चजवळील नवी जागा मोठी असून तेथे एकाचवेळी मोठय़ा संख्येने ग्राहकांना सामावून घेता येईल. येथील उपाहारगृह तळमजला आणि पहिला मजल्यावर असणार आहे. येथे ७६ जणांनी एकाच वेळी बसता येईल. याशिवाय पहिल्या मजल्यावर एक छोटेखानी सभागृह बांधण्यात येणार असून येथे केळवण, व्याही भोजन असे छोटेखानी समारंभ आयोजित करण्याची सोय असणार आहे.

गेली ३० वर्षे मुंबईकरांना खाद्यसेवा पुरविणाऱ्या आस्वादने चवीत कधी कसूर तर केली नाहीच, पण मराठमोठय़ा खाद्यपदार्थाशी इमान राखले. म्हणून आजही आस्वादच्या ‘मेन्यूकार्ड’मध्ये पाश्चात्त्य, चायनीज किंवा पंजाबी खाद्यपदरथ वा कोल्ड्रिंकने शिरकाव केलेला दिसत नाही.

गेल्या वर्षी जगातील चविष्ट शाकाहारी पदार्थ म्हणून आस्वादच्या मिसळ पावची निवड करण्यात आली होती. तसेच, लोबल फुडी हब पुरस्काराने मिसळ पावला सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी येथे डाइट आहार सुरू करण्यात आला असून ‘सात्त्विकी’ नावाचे खाद्यपदार्थ सुरू करण्यात आले आहे. यात सलाड, फुट्र, भाज्यांचे सूप, खाकरा अशा पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे.

पदार्थाच्या सादरीकरणावर भर

उपाहारगृहांमधील स्पर्धा वाढत असून मुंबईत पाश्चात्त्य खाद्यपदार्थाच्या शाखांकडे खवय्यांचा मुख्यत्वे तरुणांचा कल वाढत आहे. चवीबरोबरच सादरीकरणामुळे खवय्ये आकर्षित होत असतात. पाश्चात्त्य खाद्यपदार्थाच्या शाखांमध्ये पदार्थाच्या सादरीकरणाला महत्त्व दिले जात असून धावपळीत प्रवासादरम्यान खाता येईल अशा पदार्थाकडे लोकांचा ओढा अधिक असतो. आस्वादनेही खवय्यांच्या सोयीनुसार पदार्थाची पॅकिंग केली आहे. यात भाज्या घातलेली आणि गोड करंजी असे हातात घेऊन खाता येणारे पदार्थ सुरू करण्यात येणार आहे.

व्हराडी पदार्थाची मेजवानी

आस्वाद व्हराडी आणि विदर्भातील खाद्यपदार्थही सुरू करणार आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार विदर्भातील शेवभाजी, व्हराडी ठेचा उपलब्ध होणार आहे, तर ग्राहकांच्या मागणीनुसार शाकाहारी थाळी सुरू करणार आहे.