स्वच्छ भारत – स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत शिवाजी पार्कचा परिसर कायमस्वरुपी स्वच्छ राखण्यासाठी स्थानिकांच्या सहभागातून पालिकेकडून शनिवारी, २२ नोव्हेंबरपासून स्वच्छता स्पर्धा सुरू करण्यात येत आहे. या स्पर्धेअंतर्गत कर्मचारी वगळता स्वच्छतेसाठी सर्व साधने पालिकेकडून पुरवण्यात येत असून या परिसरातील दहा रस्ते स्वच्छ ठेवण्याचे आव्हान स्थानिक नागरिकांनी स्वीकारले आहे.
पालिकेकडून दर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान शहराच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवली जाते. ही स्वच्छता मोहीम ही केवळ शनिवारच्या दोन तासांपुरती मर्यादित राहू नये व नागरिकांनी स्वेच्छेने सहभाग घेऊन स्वतचा परिसर कायमस्वरुपी स्वच्छ राखावा यासाठी पालिकेकडून पुढाकार घेण्यात येतो. शिवाजी पार्कच्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या सहकार्याने पालिकेचे आव्हान स्वीकारले आहे. या अंतर्गत या परिसरातील दहा रस्ते स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी साधने पालिकेकडून पुरवण्यात येतील. या कामावर दोन महिने लक्ष ठेवले जाईल व उत्कृष्ट काम करण्यासाठी बक्षिसेही देण्यात येतील. या स्पर्धेची सुरुवात आज, शनिवारपासून होत आहे.