गेल्या काही दिवसांपासून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तांत्रिक कारण पालिका पुढे करत असली तरी मलबार हिल परिसरात सुरळीत पाणी देण्यासाठीच शिवाजी पार्कचे पाणी पळविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 दादर, वरळी आणि मलबार हिल परिसराला एकाच मुख्य जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. सध्या तलावांची पातळी घसरल्याने अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. शिवाजी पार्क परिसरातील कॅडल रोडच्या नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
याबाबत दोनवेळा पालिकेच्या मुख्य हायड्रोलिक इंजिनियरकडे तक्रारी करण्यात आला होता. शुक्रवारी एकदाच पाण्याचा दाब वाढविल्यानंतर रविवारपासून पुन्हा पाण्याचा दाब कमी झाला होता. मंगळवारी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पालिकेत्या मुख्य हायड्रोलिक अभियंत्यांची भेट घेतली. त्यानंर पाणापुरवठा सुरळीत सुरू झाला. केवळ तांत्रिक कारणामुळे दाब कमी झाला होता असे पालिकेने स्पष्ट केले.