पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित ‘शिवनेरी’ बसला झालेल्या अपघातात बुधवारी एका महिलेचा मृत्यू झाला, तर चार प्रवासी जखमी झाले. बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास खोपोलीजवळ हा अपघात झाला.
महामार्ग पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेटहून दादरकडे निघालेल्या शिवनेरी बसची खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या खासगी बसला धडक बसली. धडकेमध्ये खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. पूजा प्रल्हाद माने असे तिचे नाव आहे. तिचे वडीलही या अपघातात जखमी झाले आहेत. त्याचबरोबर शिवनेरी बसचा चालक बालाजी सुकाळे हा देखील अपघातात जखमी झाला असून, सर्व जखमींवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खासगी बस जय ट्रॅव्हल्स कंपनीची होती आणि ती मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. शिवनेरी बसमधून एकूण ७ प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी दोघेजण अपघातात जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर काहीवेळ परिणाम झाला होता.