मुंबई-पुणे मार्गावर लोकप्रिय ठरलेल्या शिवनेरीचे ‘लाइव्ह अपडेट्स’ थेट मोबाइलवर मिळण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ‘शिवनेरी’ नावानेच एक मोबाइल अॅप तयार करण्यात आले असून सुरुवातीला पाच गाडय़ांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. यात शिवनेरी बस नेमकी कुठे पोहोचली आहे, किती वेळेत थांब्यावर पोहोचणार आहे, अशी सर्व माहिती प्रवाशांना थेट अॅपच्या माध्यमातून मिळवता येणार आहे. ही सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांना बस स्थानकात गाडीची वाट पाहत ताटकळत उभे न राहता वेळेचे नियोजन करणे शक्य होणार असल्याचा दावा एसटी महामंडळाचे अधिकारी करत आहेत. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १७ हजार बसगाडय़ा असून यामध्ये वातानुकूलित शिवनेरी बसगाडय़ा ११० आहेत. यात ४४ बस महामंडळाच्या मालकीच्या असून ६६ भाडे तत्त्वावर आहेत. या सेवेला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी थेट मोबाइलवर ही अपडेट्स सेवा सुरू केली आहे. पुढील दोन आठवडय़ांत ही सेवा टप्प्याटप्प्याने शंभर बसगाडय़ांमध्ये सुरू केली जाणार असल्याचे एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. याशिवाय बस गाडय़ांमध्ये आणि डेपोत स्क्रीन बसवून शिवनेरी विषयी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. यासाठी बस गाडय़ांमध्ये अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे.