मालाड येथील शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव याच्या हत्येप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. किरकोळ वादातून रमेशची मंगळवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली होती. रमेश जाधव हा शिवसेनेचा गटप्रमुख असून मालाडच्या कोलडोंगरी परिसरात राहतो. मंगळवारी संध्याकाळी रमेशचा काही तरुणांशी वाद झाला होता. त्या वादातून मंगळवारी संध्याकाळी काही तरुणांनी घरात घुसून रमेशवर वार केले होते. रमेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त पसरताच परिसरात तणाव निर्माण झाला होता. लोकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता तसेच महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला .प्रकरणाचे गांभीर्य पाहून तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी रात्री घटनास्थळावर जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी तपास करून ५ जणांना अटक केली आहे. त्यांना २७ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.