शिवसेना आणि भाजप यांच्यात एखाद्या मुद्द्यावर मतभेद असले म्हणजे आमच्यात वितुष्ट निर्माण झाले, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप युतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले. सेना आणि भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझा नियमित आणि उत्तम संवाद आहे. त्यामुळे सध्या सरकारचे सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. मात्र, एखाद्या विषयावर नुसते वेगळे मत जरी व्यक्त केले तर भांडण झाले असा राष्ट्रवादीसारखा समज तुम्ही करून घेऊ नका, असा सल्ला फडणवीसांनी दिला. गेल्या काही दिवसांमध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि परदेश दौऱ्यादरम्यान मोदींनी मंगोलियाला सढळहस्ते केलेली आर्थिक मदत यांसारख्या मुद्द्यांवरून शिवसेनेने भाजप आणि मोदींना सातत्याने लक्ष्य बनविले होते.
या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीसांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल शंका घेण्याचे कारण नसल्याचे सांगितले. युतीत विसंवाद असल्याच्या अतिरंजित बातम्या प्रसारमाध्यमांकडून पसरविल्या जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.