देशात पठाणकोटसारखे हल्ले होतात तेव्हा हे लष्करी सामर्थ्य कुठे लुप्त होते, असा सवाल विचारत शिवसेनेने गुरूवारी केंद्राच्या पाकिस्तानसंदर्भातील भूमिकेवर टीका केली. फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यांच्या उपस्थितीत देशाचा ६७ वा प्रजासत्ताकदिन पार पडला. राजपथावर जो नेत्रदीपक वगैरे सोहळा पार पडला त्यात आपल्या लष्करी सामर्थ्याचे भव्यदिव्य प्रदर्शन झाले. हिंदुस्थानचे लष्करी सामर्थ्य किती अफाट आहे ते या निमित्ताने दिसले. हे एकप्रकारे राष्ट्राचेच सामर्थ्य असते. पण हे सामर्थ्य पठाणकोटसारखे हल्ले होतात तेव्हा कुठे लुप्त होते? असा सवाल सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
पॅरिसवर हल्ले होताच ओलांद यांनी गर्जना केली ती फ्रान्सच्या दुश्मनांच्या मनात धडकी भरवणारी होती. ‘वेळ येताच योग्य ठिकाणी धडा शिकवू’ असे त्यांनी आपल्या राज्यकर्त्यांप्रमाणे सांगितले नाही, असेदेखील या अग्रलेखात म्हटले आहे. फ्रान्सने स्वदेशातील दुश्मनांचे अड्डे पॅरिस हल्ल्यानंतर खणून काढलेच, कोणतीही दयामाया दाखवली नाही. बाजूच्या बेल्जियम, नेदरलॅण्डसारख्या राष्ट्रांत घुसूनही फ्रान्स सैन्याने कारवाई केली व त्यापैकी अनेक दुश्मनांना यमसदनी पाठवून पॅरिस हल्ल्याचा बदला घेतला. पठाणकोट हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला पुरावे हवे आहेत. ते पुरावे तपासायला पाकिस्तानचे एक चौकशी पथक पठाणकोट येथे पोहोचणार आहे व त्यानंतर कसे काय ते ठरेल. म्हणजे तूर्त तरी सगळेच हवेतील इमले आहेत, असे सांगत सेनेने केंद्राच्या पाकिस्तानसंदर्भातील भूमिकेवरही निशाणा साधला आहे.