भाजपची साथ सोडल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘शोले’ चित्रपटातील असरानी या जेलरप्रमाणे होईल, अशा जळजळीत शब्दांमध्ये भाजपकडून करण्यात आलेली टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून, शुक्रवारी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची तुलना ‘शोले’मधीलच गब्बर सिंह या खलनायकाशी केली. वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमित शहा गब्बर सिंहच्या भूमिकेत पक्के बसतात. त्यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला. तर ते त्या भूमिकेला शोभतात, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
भाजपचे पाक्षिक ‘मनोगत’मध्ये शिवसेनेवर टीका करणारा लेख लिहिणारे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यावरही पेडणेकर यांनी टीका केली. माधव भंडारींची तुलना ‘हलचल’ चित्रपटातील राजपाल यादवने साकारलेल्या भूमिकेशी केली आहे. या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमध्ये राजपाल यादवला सारखे झटके येत असतात. त्याप्रमाणेच माधव भंडारी यांना झटके येतात का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.