लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी उरणमध्ये चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण करण्यात आली आहे का, अशी खोचक शंका व्यक्त करून शिवसेनेने पुन्हा एकदा मित्रपक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये कलह रंगण्याची चिन्हे आहेत. सध्या राज्यभरात निघत असलेल्या लाखोंच्या मराठा मोर्च्यांमुळे सरकारपुढे पेच उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली आहे. महाराष्ट्रातील वातावरण आधीच तणावाचे व अस्थिर बनले आहे. ‘मराठा’ मोर्च्यांची धडक बसत असल्याने अनेकांच्या खुर्च्या हलू लागल्या आहेत. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल काय अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे चार काळ्या वेषातील अतिरेकी घुसल्याची बोंब ठोकून लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी चार संशयित अतिरेक्यांची अदृश्य भुताटकी निर्माण केली की काय असेही लोकांना वाटू लागले, अशी शंका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आली आहे.  चार सशस्त्र बंदूकधार्‍यांना फक्त चार शाळकरी मुलांनी पाहिले व सर्व ‘प्रौढ’ मंडळी तेव्हा डोळ्यांस पट्ट्या बांधून वावरत होती असे तरी कसे म्हणता येईल?, असा सवालही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी  पाच संशयित दहशतवादी उरणमध्ये दाखल झाल्याच्या शक्यतेनंतर नौदलासह पोलीस व एनएसजीच्या कमांडोंनी या संशयितांच्या शोधासाठी उरणचा परिसर पिंजून काढला होता. याठिकाणी विद्यार्थ्यांनी या संशयितांना पाहिले ते ठिकाण नौदलाच्या दारूगोळा साठ्याजवळ व आयएनएस अभिमन्यूपासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळे त्वरीत हायअलर्ट जारी करण्यात आला होता. समुद्रमार्गे आलेल्या लष्कर ए तैयब्बाच्या सशस्त्र दहशतवाद्यांनी २००८ साली मुंबईवर केलेल्या हल्ल्यात १५० हून अधिक जणांचा जीव गेला होता. नऊ दहशतवाद्यांनी तीन दिवस भारतीय सुरक्षा दलांना झुंजवले होते. या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी होताच मुंबईत विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. वाहनांचीही तपासणी केली जात होती.  मात्र, संशयितांचा मागमूस लागू शकला नव्हता.अखेरीस नौदलाने शोधमोहीम थांबवत असल्याचे जाहीर केले होते.