वांद्रे पोटनिवडणुकीतील नारायण राणे यांच्या पराभवानंतर शिवसेनेने गुरुवारी ‘सामना’तील अग्रलेखामधून कॉंग्रेसवरही हल्लाबोल केला. पती आधार गमावलेल्या बाळा सावंत यांच्या पत्नीसमोर एक मस्तवाल उमेदवार देऊन कॉंग्रेसने स्वत:चेच वस्त्रहरण करून घेतल्याची टीका या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.
वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांनी नारायण राणे यांचा १९ हजार मतांनी लाजीरवाणा पराभव केला. सहा महिन्यात सलग दुसऱयांदा शिवसेनेच्या उमेदवाराने नारायण राणे यांना पराभूत केल्यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांना हे दोन्ही पराभव अत्यंत जिव्हारी लागलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीसुद्धा काल ताकद नसतानाही उगाच दंडाच्या बेटक्या फुगवून अंगावर येण्याचा प्रयत्न करू नये. शिवसैनिक हा ढाण्या वाघ आहे. त्याच्या नादाला लागू नका, असा टोला नारायण राणे यांना लगावला होता.
त्यानंतर गुरुवारी अग्रलेखामधून नारायण राणे, कॉंग्रेस आणि एमआयएम या सर्वांवर शिवसेनेने निशाणा साधला. “राणे यांचा २० हजार मतांनी पराभव झाला. कुडाळातील त्यांचा पराभव १० हजार मतांनी झाला. म्हणजे त्यांच्या पराभवाचे मताधिक्य दुप्पट झाले. पुढच्या निवडणुकीत हे महाशय किमान तिप्पट मताधिक्याने पराभूत होतील याविषयी आमच्या मनात शंका नाही. शिवसेनेच्या भाग्याने राणे यांच्यासारख्यांचे भाग्य आतापर्यंत उजळत होते. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसताच हे भाग्य व चमक दूर गेली. स्वयंभूपणाची मस्ती हे अलंकार नसतात, तर ते धोंडे असतात व हेच धोंडे गळ्यात बांधल्याने तुम्ही बुडत असता व नाकातोंडात पाणी जात असताना कोणी वाचवायला येत नाही. शिवसेनेस आव्हान देणे सोपे नाही. शिवसेना हे निष्ठावंतांचे वादळ आहे व मर्दानगीच्या उसळत्या लाटा आहेत.” असे मत अग्रलेखात मांडण्यात आले आहे.