महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आपण पार्टटाइम गृहमंत्री नसून, ओव्हरटाईम गृहमंत्री असल्याचे जाहीर केले ते खरे असेलही, पण पोलीस मात्र सततच्या ओव्हरटाइमने बेजार झाले असून ते आपल्याच सहकार्‍यांच्या हत्या व आत्महत्या करू लागले आहेत, या शब्दांत शिवसेनेने सोमवारी राज्याच्या गृह खात्यावर टीका केली. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यामध्ये एका पोलीसानेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर पोलीसांवरील ताणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीसांच्या कामाची वेळ आणि सुट्ट्या हे मुद्दा सुद्धा चर्चेत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘सामना’तील अग्रलेखातून या विषयावर मत मांडले आहे.
शेतकर्‍यांप्रमाणेच महाराष्ट्रात पोलिसांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, पण फक्त एक हत्या व एक आत्महत्या अशी नोंद करून गृहखाते या प्रकरणाची फाईल बंद करणार आहे काय? असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर, ज्यांच्या हाती राज्याची व जनतेची सुरक्षा आहे त्यांचे मानसिक संतुलनच असे बिघडलेले असेल तर यापेक्षाही भयंकर घटना उद्या घडू शकतात. एक दिवसाच्या रजेवरून वाद होत आहेत आणि पोलीसच पोलिसांचे शत्रू बनत आहेत. हे असे प्रकार भविष्यात टाळता आले तर मुंबई पोलिसांची शानही राहील व ताकदही वाढेल, असे मत मांडण्यात आले आहे. पोलिसांना माणुसकीने वागवले जात नाही. पोलीस माणूस आहे व त्यांनाही कुटुंब आहे, त्यांनादेखील त्यांच्या कुटुंबाकडे पाहावे लागते, याचा विचार कोणी करणार नसेल तर वाकोल्याप्रमाणे घटना घडत राहतील, असेही लिहिण्यात आले आहे.