गुंडांना पक्षप्रवेश देण्यावरुन शिवसेनेने भाजपवर ‘सामना’मधून जोरदार टीका केली आहे. गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढविणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत ‘कमल निवासा’त विराजमान झाले, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने गुंडांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे. सत्तेचा तीळगूळ सगळ्यांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे, असा ‘मित्रत्वाचा’ सल्लादेखील शिवसेनेने दिला आहे.

‘सत्ताधारी पक्ष असल्यामुळे सध्या अनेक लोक त्यांच्या दारात तीळगुळासाठी उभे आहेत व दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत तीळगूळ भरवण्याचे ‘गोड’ कार्यक्रम सुरू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस हे पक्ष भ्रष्ट, टाकाऊ, चारित्र्यहीन, गुंडांचे पक्ष म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. भारतीय जनता पक्ष हा साधनशूचिता वगैरे मानणाऱ्यांपैकी असल्याचे अनेक वर्षे बोलले जात आहे. भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली शुद्ध चारित्र्याचे, गुंड-झुंड मुक्त राजकारण करेल, असे लोकांना वाटले होते. मात्र एन. डी. तिवारी यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्याच्या भाजप प्रवेशाने तीळगुळात मिठाचा खडा पडला,’ असे शिवसेनेने सामनातून म्हटले आहे.

‘सत्ताधाऱ्यांच्या गंगेत डुबक्या मारून स्वतःस पावन करून घेत असतात. उत्तर प्रदेशात तेच सुरू आहे व महाराष्ट्रातही तेच तेच चालले आहे. भाजप हा गुंडांचा पक्ष अशी टीका अजित पवारांनी केली. कारण हे सर्व लोक कालपर्यंत राष्ट्रवादीत होते व अजित पवार गुंडांचे आश्रयदाते असल्याची टीका कालचा विरोधी पक्ष करीत होता. अजित पवार आपल्या जागी आहेत. फक्त गुंडांनी आश्रयदाते बदलले आहेत. मनगटावरचे घडय़ाळ सोडून कमळ घेतले व देवपूजेला लागले. अनेक नामचीन लोक राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा व चारित्र्याचे काय? असे विचारले जाऊ शकते,’ अशा शब्दांमध्ये भाजपमध्ये सुरू असलेल्या गुंडांच्या इनकमिंगवर शिवसेनेने निशाणा साधला आहे.

गुरुवारी शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या युतीविषयी चर्चा झाली. यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपच्या काही नेत्यांकडून सुरू असलेल्या बेताल वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर ‘दोन्ही बाजूच्या नेत्यांनी थोडा संयम बाळगायला हवा. एकमेकांवर बोलू आणि लिहू नये,’ असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले होते. मात्र आशिष शेलारांच्या या वक्तव्याच्या दुसऱ्याच दिवशी सामनामधून शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे.