भाजप-शिवसेनेत जोरदार खणाखणी सुरू असताना शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर शुक्रवारी होत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्र व राज्य सरकारवर तोफा डागल्या जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनही करण्याची तयारी करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये अनेक कारणांवरून ठिणग्या पडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यावरून मानापमान नाटय़ रंगले. भाजपने श्रेय घेण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचा पक्षासाठी वापर केला. त्या वेळी झालेले राजकारण, इंदू मिलच्या जागेसाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने राज्य सरकारकडून वसूल केलेली किंमत यावर ठाकरे टीका करण्याची शक्यता आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या सभेत पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेचा विरोध मोडून काढून भाजपने पोलीस संरक्षणात पार पाडले. आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई टाकल्याच्या आंदोलनावरून शिवसेनेवर टीकाटिप्पणी झाली.
या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे हे भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोलेबाजी करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दाखविलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न आणि भडकलेली महागाई यावरही ठाकरेंकडून घरचा आहेर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.