वाढती असहिष्णूता आणि देश सोडण्याचा विचार यावर अभिनेता आमीर खानने केलेल्या वक्तव्यावरून त्याच्यावर सर्वबाजूंनी टीका होऊ लागली आहे. त्यानंतर आज शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून जोरदार टीका केली असून आमिरला रणछोडदास असे संबोधले आहे. फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घेतले, असा सवालही उद्धव ठाकरेंनी सामनातून विचारला आहे. देश सोडून जाण्याची भाषा बेईमानीची आहे, या देशाने जे वैभव दिले ते सर्व इकडेच ठेवा आणि मग देश सोडून जाण्याची भाषा खुशाल करा.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, अधूनमधून हिंदी सिनेमातील ‘खान’ मंडळींना देश सोडून जायची उबळ येत असते. अशी उबळ काही वर्षांपूर्वी शाहरूख खानला आली होती व त्याच आजाराचे डेंग्यू मच्छर आमिर खानलाही चावल्याने देश सोडावा काय? या विचारात तो गुरफटला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दुसर्‍या बायकोने भीतीपोटी मुलाबाळांसह देश सोडून जाण्याचा विचार केला होता. आमिरला कोणत्या कारणांमुळे देशातून पळून जावेसे वाटले व या बाईलबुद्ध्याने ‘मातृभूमीस’ टांग मारून फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घ्यावे हे त्याचे त्यालाच माहीत. आमिर खानच्या या वक्तव्याने त्याच्या ‘सत्यमेव जयते’चा मुखवटा साफ गळून पडला आहे व देशभक्तीचा फुगा फुटला आहे. याच देशाने आमिर खानसारख्यांना लोकप्रियता, प्रतिष्ठा व वैभव मिळवून दिले. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. ‘पीके’सारख्या चित्रपटात हिंदू धर्मावर यथेच्छ टीका व देवांवर ‘टिपण्या’ असूनही हा चित्रपट शेकडो कोटींचा धंदा आमीरला देऊन गेला तो काय हा देश असहिष्णू आहे म्हणून?
हिंदुस्थान हा देश राहण्यालायक वाटत नसेल तर हे ‘इडियट रणछोडदास’ कोणत्या देशात जाणार आहेत असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.