शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये मराठा मोर्चावर छापून आलेल्या व्यंगचित्रावर अखेर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. सामनात आलेले व्यंगचित्र ही पक्षाची भूमिका नाही असे स्पष्टीकरण सुभाष देसाई यांनी दिले असून हा वाद पेटवण्यामागे राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मराठा मोर्चावर सामनात छापून आलेल्या व्यंगचित्राचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरेंनी या व्यंगचित्रासाठी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर या व्यंगचित्रातून शिवसेनेची मराठा आरक्षणाविषयीची भूमिका दिसून येते असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते.  अखेर या वादावर सुभाष देसाई यांनी दुरध्वनीद्वारे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी व्यंगचित्र ही पक्षाची भूमिका नाही असे स्पष्ट केले. मराठा क्रांती मोर्चातील भगवे झेंडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बघवत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले. १५ वर्ष सत्ता उपभोगूनही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आता ही मंडळी विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुभाष देसाई यांनी केला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करणा-या मंडळींना सत्यपरिस्थिती माहित आहे. कोण आपल्या मागे आहे हे त्यांना माहित आहे. ते या राजकारणाला बळी पडणार नाही असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी या वादावर माफी मागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विघ्नसंतोषीपणा खपवून घेणार नाही असेही देसाईंनी सुनावले आहे. मंगळवारी दुपारी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यात व्यंगचित्रावरुन निर्माण झालेल्या असंतोषावर चर्चा करण्यात आली. सध्याच्या स्थितीला कसे सामोरे जायचे यावरही विचारमंथन करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, व्यंगचित्रावरुन शिवसेनेतही नाराजी पसरली आहे. जालना येथे शिवसेनेच्या पदाधिका-यांनी राजीनामा दिल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे भोकरदनमधील तालुकाप्रमुखांनी व्यंगचित्राच्या निषेधार्थ पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सादर केल्याचे वृत्त आहे.