मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपवर शिवसेनेने गंभीर आरोप केला आहे. ‘मनी’ आणि ‘मुनी’च्या जोरावर भाजपने मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक जिंकली, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत केला. निवडणुकीदरम्यान भाजपचा प्रचार करणाऱ्या जैन मुनींवरही त्यांनी शेलक्या शब्दांत टीका केली.

भाजपने मिरा-भाईंदरची निवडणूक जिंकण्यासाठी जैन मुनींची मदत घेतली. या जैन मुनींनी जातीच्या आधारावर मते मागितली. त्यामुळेच भाजपला निवडणुकीत इतका मोठा विजय मिळाला. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांच्या राजकारणासाठी एखाद्या जैन मुनीसमोर लोटांगण घालणे, हा आचारसंहितेचा भंग आहे. शिवसेनेनेही या निवडणुकीत आठ जागांवर जैन समाजातील उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एक उमेदवार जिंकला तर अन्य सात उमदेवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अमराठी समाज शिवसेनेच्या पाठिशी नाही, असा प्रचार केला जात आहे. या मतदारांना शिवसेनेपासून तोडण्यासाठीचा हा डाव आहे. मात्र, यापुढे शिवसेनेविरोधात एक शब्दही उच्चारला तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे राऊत यांनी ठणकावले.

मिरा-भाईंदरमध्ये भाजपला विजयी करा, असे सांगणाऱ्या एका जैन मुनींची व्हिडिओ क्लिप निवडणुकीपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये संबंधित जैन मुनींनी पर्युषण पर्वातील मांसाहार सेवनाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. हे सगळे प्रकार रोखण्यासाठी भाजपला मतदान करा, असे जाहीर आवाहनही त्यांनी केल्याचे या क्लिपमध्ये दिसते. निवडणुकीत अशाप्रकारे एखाद्या पक्षाचा प्रचार करणे राज्यघटनेचा आणि निवडणुकीच्या आचारंसहितेचा भंग ठरतो, असा आक्षेप घेत शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

या व्हिडिओ क्लिपचा संदर्भ देत राऊत यांनी जैन मुनींवर तोफ डागली. हिंसाचार करू नका, हे आम्हाला आता ‘लफंगे मुनी’ सांगणार का? अशा मुनींच्या रूपाने जैन समाजातील तालिबानी वृत्ती वाढत आहे. जैन समाजाने त्यांच्यापासून सावध राहायला हवे, असे राऊत यांनी सांगितले. त्यांनी या मुनीची तुलना थेट वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईकशी केली. तसेच त्यांना लफंगा, विदूषक, अतिरेकी असेही संबोधले.