नोटाबंदीनंतर गोंधळाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेकडे धाव

केंद्रातील भाजपचे नेते काडीमात्र महत्त्व देत नसल्यानेच संतप्त झालेल्या शिवसेनेने नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरुद्ध रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरना सादर केलेल्या पत्रात चक्क माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाचा हवाला दिला आहे. भाजपवर कुरघोडी करण्याकरिता शिवसेनेने काँग्रेसचा आधार घ्यावा लागला आहे.

निश्चलनीकरणानंतर सामान्य जनतेला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचा मुद्दा शिवसेनेने उचलला आहे. या मुद्दय़ावर आधी मोर्चा काढण्यात येणार होता. पण मोर्चा रद्द करीत शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर ऊर्जित पटेल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सहकारी बँकांवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे शेतकरी, मजूर आदी वर्गाचे होणारे हाल, पैसे काढण्याकरिता लागणाऱ्या रांगा हे मुद्दे निवेदनात आहेतच, पण चक्क काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांच्या विधानाचा उल्लेख करीत भाजप सरकारच्या निर्णयाने कसे गैरव्यवस्थापन झाले आहे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

याशिवाय डॉ. अमर्त्य सेन आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काही ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांनी निश्चलनीकरणावर घेतलेल्या आक्षेपाचाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. डॉ. अमर्त्य सेन हे कट्टर मोदीविरोधक म्हणून ओळखले जातात.

निश्चलनीकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर ५० दिवसांचा कालावधी द्या, असे भावनिक आवाहन मोदी यांनी केले. २७ दिवस झाल्यावरही फार काही फरक पडलेला नाही याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले आहे.