एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची विमानाची तिकीटे रद्द केल्यानंतर त्यांनी रस्तेमार्गे दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते कारने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर ते उद्या लोकसभेत उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे.

गायकवाड हे राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला निघाले आहेत, अशी ‘सुस्साट’ चर्चा होती. एक्स्प्रेसच्या तिकीट आरक्षण यादीतही त्यांचे नाव होते, असे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठीच ‘बाय रोड’ जाण्याचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. एअर इंडियाच्या हैदराबाद ते दिल्ली या विमानाचे तिकीट त्यांनी काढले होते. तर मुंबई ते दिल्ली असे तिकीटही त्यांनी आरक्षित केले होते. पण ही दोन्ही तिकीटे एअर इंडियाकडून रद्द करण्यात आली आहेत. तिकीट रद्द करण्याची ही दुसरी वेळ असून, याआधीही त्यांचे तिकीट रद्द केले होते.

खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावर बंदी घालणाऱ्या विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेने लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हा प्रस्ताव दाखल केला होता. दरम्यान रवींद्र गायकवाड यांनी काढलेले मुंबई-दिल्ली विमानाचे तिकिट एअर इंडियाने पुन्हा एकदा रद्द केले होते. खासदार गायकवाड यांनी मुंबई-दिल्ली विमानाचे तिकिट काढले होते. परंतु, एअर इंडियाने ते पुन्हा एकदा रद्द केले होते. शिवसेना खासदारांची लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती यांच्यासोबत चर्चा झाली होती. या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे अशोक गजपती यांनी कालच सांगितले होते. सोमवारी अडसूळ यांनी लोकसभेत गायकवाड यांच्यावरील बंदीचा मुद्दा मांडला होता. विनोदवीर कपिल शर्मानेही मद्यधुंद अवस्थेत विमानात गैरवर्तन केले होते. पण त्याच्यावर बंदी घातली गेली नाही, असे अडसूळ यांनी निदर्शनास आणून दिले होते. गायकवाड यांच्यावरील कारवाईवरुन अडसूळ आक्रमक झाले होते. अडसूळ यांनी बंदीचा मुद्दा उपस्थित केल्यावर नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री अशोक गजपती राजू यांनी या प्रश्नावर उत्तर दिले होते. नियम हे सर्वांसाठीच समान आहे असे राजू यांनी स्पष्ट केले होते. हवाई वाहतुकीदरम्यानच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे कठोर नियम आहेत, असे ते म्हणाले होते. दरम्यान, एअर इंडियाने विमानाची तिकीटे पुन्हा रद्द केल्यानंतर गायकवाड यांनी रस्तेमार्गे दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. ते कारने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.