मुंबई महापालिकेच्या कारभारावर सातत्याने टीका करणाऱ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी खडेबोल सुनावले. टीकाकारांनी आमच्यावर जरूर टीका करावी. टीकेला आमचा अजिबात विरोध नाही. पण त्याचवेळी महापालिका किती मोठे आव्हान पेलते आहे. याचाही विचार केला जावा आणि चांगल्या कामाचेही कौतुक केले जावे. नाहीतर नुसत्या टीकेला काही अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईतील रे रोडवरील पंपिग स्टेशनच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी महापालिकेने केलेल्या विविध कामांची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्यावर्षी पावसामुळे रस्ते तुंबले होते. यावेळी रस्ते तुंबले नाहीत. तर टीका करणाऱ्यांना रस्त्यावरचे खड्डे दिसायला लागले आहेत. आमच्यावर टीका करायला विरोध नाही. पण टीका करणाऱ्यांनी महापालिका किती मोठे आव्हान पेलते आहे. याचाही विचार केला पाहिजे. नुसतीच टीका करण्याला काहीच अर्थ नाही.
वातावरणातील बदलाच्या परिणामांचा धोका मुंबई शहराला आहे. त्यामुळे नुसती नालेसफाई करून उपयोग नाही. मुंबईकरांनीही शिस्त पाळली पाहिजे. कोणताही कचरा नाल्यात टाकला नाही पाहिजे. त्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये संकट येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला भाजपचे आमदार आशिष शेलार अनुपस्थित होते.