जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध अधिक तीव्र करण्याचा आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात रान पेटविण्यासाठी व्यापक व दीर्घकालीन आंदोलन उभारण्याची तयारी शिवसेनेकडून केली जाणार आहे. कोकणातील जनतेच्या जीविताला गंभीर धोका असलेला हा प्रकल्प नको, ही शिवसेनेची भूमिका कायम असल्याची ग्वाही देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांशी व वरिष्ठ नेत्यांशी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा केली.

जैतापूर प्रकल्पाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी शिवसेना खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी नवी दिल्लीत भेट घेतली. मोदी यांनी बरेच दिवस भेटीसाठी वेळ न दिल्याने निर्वाणीचा इशारा दिल्यावर मोदी यांच्याकडून शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळास भेट देण्यात आली. अणुप्रकल्पाचे परिणाम घातक असून राज्यात हा प्रकल्प नको, याविषयी तज्ज्ञांशी विचारविनिमय करण्याची मागणी शिवसेनेने पंतप्रधानांकडे केली आहे. पण ते शिवसेनेस दाद देण्याची आणि प्रकल्पाचा फेरविचार होण्याची सुतराम शक्यता नाही. यासंदर्भात झालेल्या घडामोडींची माहिती शिवसेना खासदारांनी ठाकरे यांना ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिली.