केंद्र आणि राज्य सरकारवर सातत्याने आसूड ओढणाऱ्या शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून टीकेसाठी योगी आदित्यनाथांच्या रूपाने नवीन लक्ष्य मिळाले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ कठोर निर्णय घ्यायचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी गुंडांना उत्तर प्रदेश सोडून जाण्याचे फर्मान बजावले होते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून योगी आदित्यनाथांच्या या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांचे हे विधान चिंता वाढवणारे आहे. योगींच्या राज्यातील गुंडांनी उत्तर प्रदेश सोडून इतर प्रांतांत जाऊन जुनाच धंदा करायचे म्हटल्यावर संपूर्ण देशात अराजक माजेल. मुंबई-दिल्लीसारखी शहरे हे भोग याआधीच भोगत आहेत, त्यात आणखी नवी भर कशाला! तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा, असा सल्ला शिवसेनेकडून योगी आदित्यनाथ यांनी देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एका रात्रीत कत्तलखाने बंद झाले. पार्कात किंवा इतरत्र ‘मजनू’गिरी करणाऱ्यांविरोधात योगी सरकारने विशेष पथके नेमून कारवाई सुरू केली आहे. गोहत्या करणाऱयांचे हात-पाय तोडू अशी धमकी भाजप आमदारांनी दिलीच आहे. मग गुंडांच्याच बाबतीत इतका हळुवारपणा का?, असा रोकडा सवाल सेनेने विचारला आहे.

नवे राज्य कायद्याचे राज्य आहे व कायदा मोडणाऱयांची खैर नाही. नवे तुरुंग निर्माण करू, पण गुंडांचे कंबरडे मोडू,’ असा दम नव्या मुख्यमंत्र्यांनी भरायला हवा. नवे राज्य आले म्हणून एकजात सर्व गुंड सूतकताईस बसणार नाहीत किंवा शरयूच्या तीरी भिक्षापात्रे घेऊन बसणार नाहीत. गुंडांनी आजपासून त्यांचे कामधंदे बंद करावेत, दहशतवादी व धर्मांधांनी यापुढे मेलेल्या सापासारखे पडून राहावे असे फर्मान सोडून कोणत्याही राज्यातील गुंडशाही थांबणार नाही, असा खोचक टोलाही या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशच्या कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर एका आठवडय़ाच्या आत जवळजवळ ५० धोरणविषयक निर्णय घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्याला काम करायचे असल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी सचिवालयाच्या कानाकोपऱ्याची पाहणी करून सरकारी यंत्रणेत योग्य तो शिष्टाचार, आरोग्य आणि वक्तशीरपणा राखण्याबाबत आपण ठाम असल्याचे आदित्यनाथ यांनी दाखवून दिले. गेल्या ४० वर्षांत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी सचिवालयाची पाहणी केली नव्हती.

या आकस्मिक पाहणीत भिंतींवर थुंकलेल्या पानाचे डाग, वर्षांनुवर्षे साचलेल्या फायलींवर धुळीचे थर आणि जागेवरून गायब असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याबरोबर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पान व पान मसाला खाण्यावर बंदी घालतानाच, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक पद्धत व सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले होते.