मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर सातत्याने टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी सत्ताधाऱ्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला. पालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी या नगरसेवकांना कोट्यवधी रूपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, असे ट्विट करून सोमय्यांनी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानाचा रोख शिवसेनेकडे असल्याची चर्चा आहे.

किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग आणि कोकण महसूल विभागाला याची तक्रार करणारे पत्र पाठवले आहे. मात्र, या पत्रात शिवसेनेच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. केवळ महापालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित पक्षाकडून पालिकेतील दोन नगरसेवकांशी संपर्कही साधण्यात आला होता. त्यांना कोट्यवधी रूपयांची ऑफर देण्यात आली. हा भ्रष्टाचाराचा प्रकार असून, लोकशाहीविरोधी आहे. याच्याविरुद्ध त्वरीत कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे पोलीस, कोकण महसूल विभाग आणि निवडणूक आयोगाने हा प्रकार थांबवण्यासाठी त्वरित पावेल उचलावीत, अशी मागणी सोमय्या यांनी पत्रात केली आहे.

भाजपच्या पाठपुरावा समितीपासून किरीट सोमय्या दूर

भांडुप पोटनिवडणुकीत गुरूवारी भाजपला विजय मिळाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी संख्याबळ वाढल्याने महापालिकेत भाजपची सत्ता व महापौर येईल, असा दावा केला होता. भाजपने निवडणुकीसाठी नियोजनबद्ध पावले टाकली होती. बूथरचना, नेत्यांच्या सभा व पदयात्रांचे नियोजन केले होते. त्यामुळे शिवसेनेला यश मिळू शकले नाही व भाजपची मते वाढली. शिवसेनेला फटका बसला आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांचा उद्धटपणा कमी होणार का, असा सवाल सोमय्या यांनी विचारला होता.