उन्हाळ्याच्या सुटीत घरी आलेल्या पाहुण्यांना मुंबई फिरवायला न्यायचे आहे आणि तिकीट खिडकीसमोर रांग असली की, तिकीट न काढता बिनधास्त लोकलने प्रवास करणारे महाभाग अनेक आहेत. या फुकटय़ा प्रवाशांना चाप लावण्यासाठी गेल्या वर्षी मध्य रेल्वेने पुणे, नागपूर, सोलापूर आदी विभागांतून तिकीट तपासनीसांची आयात केली होती. मात्र यंदा अद्याप तरी तसा काहीच निर्णय झालेला नाही. त्यातच मुंबई विभागात तिकीट तपासनीसांची कमतरता असताना उपनगरीय गाडय़ांसाठीच्या तपासनीसांना उन्हाळी विशेष गाडय़ांमध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या फुकटय़ा महाभागांचे चांगलेच फावणार आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपल्यावर सुटय़ा टाकून आपापल्या गावी जाणाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी अनुक्रमे १६८ आणि २८८ उन्हाळी विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या मध्य रेल्वेवर फक्त १२०० तिकीट तपासनीस उपलब्ध आहेत. यापैकी काही तपासनीस विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयात, काही नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत, तर ५००हून अधिक तपासनीस उपनगरीय सेवेसाठी नियुक्त असतात. पण उन्हाळाच्या दिवसांत रेल्वेतर्फे सोडण्यात येणाऱ्या विशेष गाडय़ांमध्ये तिकिटे तपासण्यासाठी या तपासनीसांना लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये काम दिले जाते.
सध्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील तिकीट तपासनीसांवरही प्रत्येकी पाच डब्यांतील प्रवाशांची तिकिटे तपासण्याचे काम आहे. यामुळे तिकीट तपासनीस बेजार झाले आहेत. त्यात या उन्हाळी विशेष गाडय़ांची भर पडल्याने रेल्वेला उपनगरीय मार्गावरील तिकीट तपासनीस लांब पल्ल्याच्या गाडय़ांकडे वळवणे अनिवार्य आहे. गेल्या वर्षी अशा परिस्थितीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने नागपूर, भुसावळ, सोलापूर आदी पाच विभागांमधून प्रत्येकी ५० असे २५० तपासनीस मुंबईत आयात केले होते. त्यामुळे मुंबईतील फुकटय़ा प्रवाशांना चाप लागला होता. यंदा अद्याप तरी असा कोणताही विचार झाला नसल्याचे मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.