कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम बुधवारच्या पहिल्याच दिवशी मुंबईत जाणवलाच नाही. रेल्वे, बस, टॅक्सी-रिक्षा आणि सरकारी निमसरकारी कार्यालये, व्यापारउदीम, सारे काही सुरळीत सुरू राहिले. राज्यातील बँका आणि वित्तीय संस्था मात्र बंदमध्ये पूर्णपणे सहभागी झाल्याने आर्थिक व्यवहार थंडावल्याचा दावा बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केला. मंत्रालयासह राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांत मात्र, बंदचा फज्जाच उडाला.
मुंबईतील रेल्वे व बेस्ट बससेवा ठप्प झाली तरच बंदचा प्रभाव जाणवतो. आज मात्र, या सेवा सुरळीत होत्या. सकाळी दगडफेकीच्या एकदोन किरकोळ घटना वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शाळा-महाविद्यालयेही सुरू होती. मुंबईच्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात दिसणारी डबेवाल्यांची धामधूम ही मुंबईच्या दैनंदिन सुरळीतपणाची साक्ष असते. आजही चाकरमान्यांना त्यांच्या जेवणाच्या सुट्टीत नेहमीप्रमाणेच जेवणाचे डबे पोहोचते झाले. त्यामुळे, बंदचा परिणाम मुंबईवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
मंत्रालयासह राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये सरासरी ७० टक्के उपस्थिती होती. अनुपस्थितांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा भरणा होता. जिल्हा परिषदांमध्ये तर सरासरी ९० टक्के हजेरी होती, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी दिली. मंत्रालयात मंत्री आस्थापनांतील शंभर टक्के कर्मचारी हजर होते. औद्योगिक क्षेत्रावरही संपाचा काही परिणाम झाला नाही, असे मीना यांनी सांगितले.
राज्यात महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील तृतीय व चतुर्थश्रेणीचे सुमारे ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी होते. १६ टक्के अराजपत्रित अधिकारी गैरहजर होते. जिल्हा परिषदांचे शिक्षक संपावर गेले नाहीत. सर्व सरकारी रुग्णालयांतही ७५ टक्के कर्मचाऱ्यांची  उपस्थिती होती. वीज, पाणी पुरवठा, दूध डेअरी, एसटी, बेस्ट इत्यादी अत्यावश्यक सेवेवर संपाचा कोणताही परिणाम झाला नाही.

पालिका सुरळीत
शिवसेनेने औद्योगिक बंदला पाठिंबा दिल्यामुळे मुंबई महापालिकेच्या महासभेची बुधवारची बैठक पुढे ढकलण्यात आली. मात्र महापालिकेतील दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू होते. पालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये सरासरी ९७ टक्के, विभाग कार्यालयांमध्ये ९३ टक्के, तर रुग्णालयांमध्ये ९४ टक्के हजेरी होती.
चहा नाही म्हणून बैठक नाही!
मंत्रालयातील उपहारगृहातील बहुतांश कामगार संपावर गेल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा-नाष्टय़ाची मात्र पंचाईत झाली. उपहारगृह बंद असल्याने चहा-नाष्टा मिळणार नाही, म्हणून मंत्रिमंडळाची बैठक सह्य़ाद्री अतिथीगृहावर घेण्यात आल्याची चर्चा होती.
‘बेस्ट’ही रस्त्यावर
पहाटे झालेल्या दोन दगडफेकीच्या घटना वगळता बेस्टची बस  सेवा सुरळीत सुरू होती. दिवसभरात बेस्टच्या ९८ टक्के बसगाडय़ा रस्त्यांवरुन धावल्या.
वेतन कापणार
काम नाही तर वेतन नाही या नियमानुसार बुधवारी संपावर गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी सांगितले.