वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे (आयआयटी) प्रवेश दोनऐवजी पूर्वीप्रमाणे एकाच परीक्षेद्वारे करण्याचा विचार आहे. दोन परीक्षांमुळे प्रवेश प्रक्रिया लांबते. परिणामी जागा रिक्त राहतात. त्यासाठी एकाच परीक्षेच्या पर्यायाचा विचार सुरू झाल्याचे ‘जेईई अपेक्स बोर्ड’मधील (जॅब) धुरीणांचे म्हणणे आहे. मात्र, त्यामुळे देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या प्रवेश प्रक्रियेबाबत गेली तीन-चार वर्षे केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या घोळाची मालिका पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१६च्या जेईईचे स्वरूप ठरविण्यासाठी मंडळाची बैठक रविवारी आयआयटी-गुवाहाटी येथे पार पडली. यात गेली काही वर्षे दोन टप्प्यात घेतल्या गेलेल्या जेईईचे स्वरूप पुन्हा एकदा बदलण्याबाबत चर्चा झाली. २०१३पासून मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स अशा दोन टप्प्यात जेईई घेतली जाते. त्याआधी एकाच जेईई या परीक्षेद्वारे आयआयटीचे प्रवेश केले जात.
सदस्यांचा आक्षेप
दोन पातळ्यांवर परीक्षा घेण्याने प्रवेश प्रक्रिया लांबते. परिणामी आयआयटीसह जेईई-मेन्सच्या आधारे प्रवेश करणाऱ्या एनआयआयटी या केंद्रीय तंत्रशिक्षण संस्थांमधील जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा सर्व आयआयटीमध्ये मिळून सुमारे २०० जागा रिक्त राहिल्या होत्या.
परंतु, एनआयआयटीच्या तुलनेत आयआयटीत जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच, या दोन प्रकारच्या शिक्षणसंस्थांमधील प्रवेश एकाच परीक्षेच्या आधारे ठरू नये, अशा मुद्दय़ावर जॅबमधील काही सदस्यांनी एकाच परीक्षेबाबत आक्षेप उपस्थित केले.
सध्या केवळ आयआयटीचे प्रवेश जेईई-अ‍ॅडव्हान्स या जेईई-मेन्सपेक्षा उच्च काठिण्य पातळी असलेल्या परीक्षेद्वारे होतात. त्यामुळे या बैठकीत एकच परीक्षा घेण्याबाबत शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. अर्थात एकच परीक्षा घेण्याचे ठरले तरी त्याची अंमलबजावणी २०१६ऐवजी २०१७पासून करावी, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली.

पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढविणार
२०१६च्या जेईई-अ‍ॅडव्हान्सकरिता पात्र विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखावरून दोन लाख इतकी वाढविण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. पुढील वर्षी आयआयटीच्या जागा वाढणार असल्याने विद्यार्थी संख्याही वाढविणे आवश्यक आहे, असा विचार त्यामागे आहे. अर्थात जेईईचे स्वरूप ठरविण्याचा अधिकार आयआयटीच्या कौन्सिलला आहे. ऑक्टोबरमध्ये कौन्सिलची बैठक होणार आहे.