सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन तत्कालीन अधिकारी आरोपी

उघड चौकशीतून शीव-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणात घोटाळा घडल्याच्या निष्कर्षांवर पोहोचताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवला. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता प्रकाश ममदापुरे, अधीक्षक अभियंता किसन माने, कार्यकारी अभियंता राजेंद्र जवंजाळ, केआयपीएल, आयव्हीआरसीएल या खासगी कंपन्या आणि इतरांना आरोपी करण्यात आले आहे. घोटाळ्यातील इतर कोण हे जाणून घेण्यासाठी येत्या काळात या तिघांची एसीबीकडून चौकशी केली जाईल. एसीबीने हा तपास ठाणे विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक किसन गवळी यांच्याकडे सोपवला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने खासगीकरणातून शीव-पनवेल महामार्गाच्या (बीएआरसी चौक ते कळंबोली चौक) रुंदीकरणाचे काम काढले. ठरावीक खासगी कंपनीला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी प्रकल्पाची निविदा प्रक्रिया, प्रकल्प हस्तांतरण प्रक्रियेत नियमांना हरताळ फासण्यात आला, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. पुढे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका करून या घोटाळ्याची चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी केली. याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने फैलावर घेतल्यानंतरच राज्य सरकारने वाटेगावकर यांच्या तक्रारीबाबत उघड चौकशीची परवानगी एसीबीला दिली होती.

प्रत्यक्षात मुंबईत शीव-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचा किंवा सुधारणा करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव नव्हता. हे काम मुंबईत येणाऱ्या पाच प्रवेशद्वारांच्या म्हणजेच मुंबईत येणाऱ्या पाच प्रमुख मार्गाच्या सुधारणेसोबत करावे, असा निर्णय शासन स्तरावर झाला होता. मात्र केआयपीएल, आयव्हीआरसीएल या कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी हे काम स्वतंत्रपणे करण्यात आले. या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या शीव पनवेल टोलवेज कंपनीला हे काम देण्यात आले. प्रत्यक्षात काम केल्यानंतर या कंपनीकडून खारघर येथे टोल उभारण्यात आला.

 टोल नाक्यांमधील अंतर कमी

वाशी आणि खारघर या दोन्ही टोलमधील अंतर सुमारे १६ किलोमीटरचे आहे. वास्तविक दोन टोल नाक्यांमधील अंतर किमान ४० किलोमीटरचे असणे बंधनकारक आहे. विशेष किंवा विशिष्ट परिस्थिती असली तरच हे अंतर कमी करण्याची परवानगी मिळू शकते. तसे मुलुंड पूर्वेकडील आनंदनगर टोल नाका आणि खारेगाव टोल नाक्यामधील अंतर कमी आहे. मात्र ही दोन स्वतंत्र शहरे आहेत. निविदा प्रक्रियेत बांधकाम विभागाने चार कंपन्यांना भाग घेण्यास मज्जाव केला. याशिवाय प्रत्येक टप्प्यावर शीव-पनवेल महामार्ग प्रकल्पात नियम मोडण्यात आल्याचा आरोप वाटेगावकर यांनी आपल्या याचिकेत केला होता.

नियमांना हरताळ

एसीबीने केलेल्या दाव्यानुसार उघड चौकशीत ममदापुरे, जवंजाळ, माने या अधिकऱ्यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करत सायन पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संगनमत केले. या सर्वानी जाणीपूर्वक गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचला. या कंपनीला आर्थिक फायदा व्हावा यासाठी नियमांना हरताळ फासत निविदा प्रक्रिया राबवली. पुढे जाऊन प्रकल्प हस्तांतरित केला, ही बाब स्पष्ट झाली. त्यानंतर गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.