कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे आधीच करण्यात आली असली तरी पानसरे यांची मुलगी स्मिता आणि सून मेघा यांनी या प्रकरणात हस्तक्षेप अर्जाद्वारे हत्येचा तपास विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी)करण्याची मागणी या आधी केली होती. मात्र यासंदर्भातील मूळ जनहित याचिका सुनावणीसाठी येत नसल्याने पानसरे कुटुंबियांनी आता स्वतंत्र याचिका केली आहे.
पानसरे यांची हत्या होऊन दोन महिने उलटले तरी आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पोलीस महासंचाकांच्या नेृतृत्त्वाखाली विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी आणि न्यायालयाने तपासावर देखरेख ठेवावी, अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी केली आहे.
दरम्यान, केतन तिरोडकर यांनी याप्रकरणी जनहित याचिका करून पानसरे यांच्या हत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. परंतु ही याचिका अद्याप सुनावणीसाठी आलेली नाही.