भारतीय कथक नृत्याला देशात आणि परदेशातही मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ कथक नृत्यसम्राज्ञी सितारादेवी यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी मुंबईत जसलोक रुग्णालयात निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. अमेरिकेत असलेला त्यांचा मुलगा भारतात गुरुवारी परतल्यानंतर सितारादेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कोलकाता येथे १९२० मध्ये जन्मलेल्या सितारा देवी यांचे मूळ नाव धनलक्ष्मी असे होते. घरी त्यांना ‘धन्नो’ या नावाने हाक मारायचे. सितारा देवी यांनी त्यांची मोठी बहिण तारा, शंभू महाराज आणि अच्छन महाराज (पं. बिरजू महाराज यांचे वडील) यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले. वयाच्या दहाव्या वर्षांपासून सितारादेवी यांनी नृत्याचे वैयक्तिक सादरीकरणाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. मात्र हे कार्यक्रम त्यांच्या वडिलांच्या मित्राच्या चित्रपटगृहात चित्रपटाच्या मध्यंतरात अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांसाठीचे असत.
मुंबईतील जहांगीर हॉलमध्ये त्यांनी पहिल्यांदा स्वत:चा असा नृत्याचा जाहीर कार्यक्रम केला. सितारादेवी यांनी देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम सादर केले. यात लंडनमधील आल्बर्ट हॉल, व्हिक्टोरिया हॉल, न्यूयॉर्क येथील सभागृहातील कार्यक्रमांचा समावेश आहे. फक्त कथक नृत्य नव्हे तर अन्य भारतीय शास्त्रीय नृत्यशैली आणि लोकनृत्यामध्ये त्या पारंगत होत्या. रुसी बॅले आणि काही पाश्चिमात्य नृत्यप्रकारही त्या शिकल्या होत्या.
सितारादेवी यांनी बॉलिवूडमधील मधुबाला, माला सिन्हा, रेखा, काजोल आदी अभिनेत्रींनीही सितारा देवी यांच्याकडून कथक नृत्याचे धडे घेतले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही हिंदी चित्रपटातून अभिनय आणि नृत्य केले होते. ‘शहर का जादू’, ‘जजमेंट ऑफ अल्लाह’, ‘नगीना’, ‘बागवान’, ‘वतन’, ‘मेरी आखे’, होली’, ‘स्वामी’, ‘रोटी’, ‘हलचल’ आणि ‘मदर इंडिया’ या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.
‘संगीत नाटक अकादमी’, ‘पद्मश्री’, ‘कालिदास सन्मान’ या पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले होते. केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर केला. पण या क्षेत्रातील माझ्या योगदानाची माहिती शासनाला नाही का, हा माझा सन्मान नाही तर अपमान आहे. माझे काम ‘भारतरत्न’च्या योग्यतेचे आहे, असे सांगत सितारादेवी यांनी तो पुरस्कार नाकारला होता.