प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याने वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याबाहेर ‘व्हॅनिटी व्हॅन’साठी बांधलेल्या अनधिकृत रॅम्पविरुद्ध कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. पालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारी या रॅम्पची पाहणी केली असून शुक्रवारी शाहरुखवर नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वांद्रे येथील माउंट मेरी चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहारुख खानचा ‘मन्नत’ बंगला असून बंगल्याबाहेर हा रॅम्प उभारण्यात आला आहे. या रॅम्पमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी पालिकेच्या विभाग कार्यालयात केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन पालिका अधिकाऱ्यांनी ‘मन्नत’बाहेरील रॅम्पची पाहणी केली होती. स्थानिक रहिवाशांनी ही बाब खासदार पूनम महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या रॅम्पवर कारवाई करण्याची मागणी केली. या रॅम्पची पाहणी करून त्यावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारी पुन्हा ‘मन्नत’बाहेरील रॅम्पची पाहणी केली. या प्रकरणी शुक्रवारी शाहरुखला नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर नियमानुसार रॅम्पवर कारवाई होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.