खांदा वसाहतीमधील न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी गौरव कंके या सहावीतील विद्यार्थ्यांने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. खांदेश्वर पोलिसांनी याप्रकरणी संबंधित शिक्षिका सोमय्या मनोहरन यांना अटक केली आहे. मंगळवारी वर्गात तास सुरू असतानाच संबंधित शिक्षिकेने गौरवला तुझ्या प्रेयसीचे नाव काय आहे असा प्रश्न विचारल्यावरून वादाला सुरुवात झाली. शिक्षिकेने केलेल्या प्रश्नावर गौरवने त्यांच्यावरच अन्य एका सहकाऱ्याशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा आरोप केला. या प्रकाराने हादरलेल्या सोमय्यांनी गौरवला वर्गशिक्षकांकडे नेले. तेथे गौरवची चांगलीच हजेरी घेण्यात आली. शाळेत घडलेला हा सर्व प्रकार घरी व इतर मुलांना समजेल त्यामुळे आपल्याला पुन्हा मार पडेल या भीतीने गौरवने थेट आत्महत्येचा मार्ग पत्करला. शिक्षिका सोमय्या यांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे, तर शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका बालाजी यांना व्यवस्थापनातील ढिसाळ कारभारामुळे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.