राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यावर बुधवारी यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झाली. सव्वासहा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयाची झडप बदलण्यात आली तसेच तीन मिलीमीटरचे छिद्रही बुजवण्यात आले. लालूंची प्रकृती स्थिर असून त्यांना आणखी तीन ते चार दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे. लालूप्रसाद यादव यांना छातीत दुखू लागल्यानंतर सोमवारी एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर बुधवारी डॉ. रमाकांत पांडा, डॉ. प्रद्योत कुमार रथ आणि डॉ. चेतन गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० डॉक्टरांच्या गटाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. पांडा यांनी यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही शस्त्रक्रिया केली होती.