माहीमच्या नया नगरमधील झोपडय़ांना लागलेल्या आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे.
माहीम -सायन लिंकरोडवर नया नगर झोपडपट्टी आहे. या ठिकाणी दाटीवाटीने सुमारे दीडशे झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. यातील काही झोपडय़ा बैठय़ा तर काही झोपडय़ांवर एक मजलाही उभारण्यात आला आहे. पहाटे पाचच्या सुमारास येथे आग लागली. तेथील एका मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या ठिकाणी असलेल्या लाकडाच्या भंगार वखारांमुळे आग पसरत गेली.  पहाटेच्या गाढ झोपेत असलेल्या लोकांनी आगीची जाणीव होताच घरातून बाहेर धाव घ्यायला सुरुवात केली. मात्र याच वेळी येथे राहणारे सैय्यद यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्या स्फोटात सैय्यद यांच्या घरातील शफी मोहम्मद (९०) यांच्यासह सबीनुद्दिन निसा सैय्यद (६०) चंदा सैय्यद (१८) हसरतुल सैय्यद (२७) या तीन महिलांचा मृत्यू झाला. तर सैय्यद यांच्या झोपडीच्या वरच्या मजल्यात रहाणाऱ्या चांद बाबू मोहम्मद शेख (४७) आणि बाबूलाला (३०) यांचाही आगीत मृत्यू झाला. या आगीत आणखी आठ जण जखमी झाले असून त्यापैकी सात जणांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीमुळे घरातील सिलिंडरस्फोटामुळे आगीची तीव्रता वाढल्याचे माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या. आगीच्या तीव्रतेमुळे अग्निशमन बंबांमधील पाणी अपुरे पडू लागले होते. परिणामी खासगी टँकर मागवून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
आगीत सुमारे ४० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. पालिका आयुक्त आणि महापौरांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपुस केली. ही जिल्हाधिकाऱ्यांची जागा होती. त्यावर ही अनधिकृत वसाहत उभी राहिल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजना प्रस्तावित असल्याती माहिती देत या आगीमागे घातपाताची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ‘इद ए मिलाद उन नबी’च्या सणावर या दुर्घटनेमुळे विरजण पडले असून या भागातले सर्व धार्मिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत.

मुलांना वाचविताना वडिलांनी गमावला जीव!
चांदबाबू मोहम्मद शेख हे दादर भाजीबाजारातील विक्रेते. रोज सकाळी लवकर उठून ते पत्नीसह दादर मार्केटला जात. शुक्रवारीही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून त्यांची पत्नी हसीना शेख स्वयंपाक  करत होत्या. अचानक आगीच्या ज्वाळा घरात घुसू लागल्या. काही समजायच्या आतच अवघी झोपडी धुरात लपेटून गेली. चांदबाबू आणि हसीनाची एकच धावपळ उडाली. झोपलेल्या मुलांना आगीतून बाहेर काढताना त्यांनी आगीची पर्वा केली नाही. एकएक करत त्यांनी मुलांसह सात जणांना घराबाहेर काढले. सर्वाना घरातून सुरक्षित बाहेर काढल्यानंतर ते पुन्हाघरात गेले. पण बाहेर पडताना घराची एक धगधगती तुळई नेमकी अंगावर पडली. अगोदरच धूर आणि आगीमुळे दमछाक झालेले चांदबाबू ही जळती तुळई दूर करू शकले नाहीत. आमच्या अब्बाने आम्हाला वाचविण्यासाठी आपला जीव गमावला, असे सांगताना त्यांचा मुलगा ईर्शादचे डोळे पाणावले होते. या धावपळीत हसीना या सुद्धा जखमी झाल्या आहेत.