मलेरिया, डेंग्यू, एचवनएनवन या व्यतिरिक्त इतर प्रकारच्या तापांमुळे मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत सहा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र बहुतांश मृत्यूमध्ये ताप हे एक लक्षण असल्याने पाचजणांचा शवविच्छेदन अहवाल आल्यावरच योग्य कारण समजू शकेल, अशी सारवासारव पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केली.
एचवनएनवन (स्वाइन फ्लू) विषाणूसंसर्गाच्या तापामुळे आतापर्यंत ३८ मृत्यू झाले असतानाच साध्या तापामुळे ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ात सहाजणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. मलेरिया, डेंग्यूमुळे होणारे मृत्यू या वेळी आटोक्यात असतानाच इतर साध्या तापामुळे सहा मृत्यू होणे ही धोक्याची घंटा आहे. या सहापैकी एकाच्या मृत्यूचे कारण तीव्र ताप आहे तर इतर पाच जणांचा शवविच्छेदनाचा अहवाल बाकी आहे. पालिका आरोग्य विभागाने पाठविलेल्या माहितीनुसार पाच पुरुष व एका महिलेचा तापामुळे मृत्यू झाला असून ते ग्रॅण्ट रोड,

कामाठीपुरा, भायखळा, परळ, कांदिवली आणि बोरिवली येथील रहिवासी होते. मात्र हे सर्व मृत्यू साथीच्या तापाचे नसल्याची सारवासारव पालिकेकडून करण्यात आली.
बहुतांश आजारांमुळे होत असलेल्या मृत्यूंच्या वेळी ताप हे लक्षण असते. काही वेळा शवविच्छेदनानंतरच योग्य कारण समजू शकते. नागरिकांनी घाबरू नये, या मृत्यूंचे निश्चित कारण लवकरच समोर येईल, अशी माहिती पालिकेच्या संसर्गजन्य आजार प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हवेत असलेल्या साधारणत: दोन हजारांपेक्षा जास्त विषाणूंमुळे साथीचा ताप येऊ शकतो. एखाद्या विषाणूमुळे ताप आला की शरीरात नैसर्गिकपणे त्याविरोधात प्रतिकारक्षमता तयार होते. अशा प्रकारच्या प्रतिकारक्षमतेमुळे विषाणूसंसर्गाचा ताप हा फार गंभीर वळण घेत नाही व साधारणत: दोन ते तीन दिवसांत रुग्ण बरा होतो. मात्र मलेरिया, डेंग्यू, एचवनएनवन हे विषाणू त्याला अपवाद ठरले आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.