ठाणे येथील कासारवडवली गावातील तुकाई चाळीमधील एका घरात शनिवारी पोलिसांना २५ रायफलींचा साठा सापडला. हा साठा जमा करणाऱ्या जम्मू-कश्मीरच्या ‘त्या’ सहा तरुणांना अटक करण्यात आली. या तरुणांचा अतिरेकी संघटनेशी संबंध नसल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली. मात्र त्यांच्याकडे रायफलींच्या परवान्याची कोणतीही कागदपत्रे सापडलेली नाहीत. त्यामुळे या तरुणांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.
या तरुणांनी इतक्या मोठय़ा प्रमाणात रायफलींचा साठा कशासाठी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. त्यामुळे या तरूणांची जम्मू-कश्मीरमधील गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला असून त्यासाठी मुंबई आणि जम्मू पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे, तसेच या तरूणांना रायफलींचा पुरवठा करणाऱ्या तरुणाचाही पोलिसांच्या पथकाने शोध सुरू केले आहे.
हे सहाही तरुण गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ते ठाणे व  मुंबई परिसरात सुरक्षारक्षकाचे काम करीत आहेत. या तरुणांकडे मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे कासावडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सूर्यवंशी, यांच्या पथकाने शनिवारी रात्री त्यांच्या घरात छापे टाकून २५ रायफली
जप्त केल्या.