एकूणच राज्यभरात पावसाने पाठ फिरवल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचे चटके आता बसू लागले आहेत. भाज्यांची आवक निम्म्यावर आल्याने दरवाढीचे नवे संकट मुंबईकरांसमोर उभे ठाकले आहे. एपीएमसीच्या वाशी बाजारात भेंडी, फरसबी, गवार, कोबी, फ्लावर, काकडी अशा सर्वच भाज्यांचे भाव २० ते ३० टक्क्य़ांनी वाढले असून किरकोळ बाजारात तर या भाज्यांचा  ६० ते ८० रुपयांचा नवा ‘लुटमार पॅटर्न’ सुरू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडत असताना ग्राहकांच्या पदरात प्रत्यक्षात काहीच पडत नसल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे येत आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला प्रामुख्याने पुणे व नाशिक जिल्ह्य़ातून भाजीपाल्याचा पुरवठा होतो. मात्र, या दोन्ही जिल्ह्य़ांत पाऊस नसल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याचा आवक घटण्यावर झाला आहे. गेल्या दोन दिवसांत ही आवक निम्म्यावर आल्याने भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. किरकोळ मंडयांमध्ये गवार, भेंडी, फरसबी, टॉमेटो, वांगी, ढोबळी मिरची अशा प्रमुख भाज्या किलोमागे ६० ते ८० अशा ‘फिक्स रेट’नुसार विकल्या जाऊ लागल्याने किरकोळ बाजारातील महागाई कधी कमी होणार, असा सवाल ग्राहक उपस्थित करू लागले आहेत. विशेष म्हणजे, आवक मंदावल्याने एपीएमसीच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या कांद्याचे दर किलोमागे दोन रुपयांनी वाढून २७ रुपयांपर्यत पोहचले. त्यामुळे किरकोळ बाजारात हाच कांदा ३५ रुपयांच्या घरात पोहचला आहे.
भाज्यांचे घाऊक दर : भेंडी (२२ ते ३२ ), फरसबी ( ४०-४४), गवार (३५ ते ४०), गाजर ( १४ ते २०), काकडी ( २० ते ३२), कोबी (१६ ते २०), फ्लावर (१६ ते २०), वांगी (१८ ते २६). उत्तम प्रतीचा टॉमेटो गेल्या आठवडय़ात १२ रुपये किलो या दराने विकला जात होता. याच टॉमेटोचे भाव शनिवारी २२ रुपयांपर्यंत पोहचले होते. दरम्यान, घाऊक बाजारात चढय़ा दरांची चाहूल लागताच किरकोळ मंडयांमध्ये भेंडी, गवार, फरसबी, शेवगा शेंग, वांगी, फरसबी यांसारख्या प्रमुख भाज्या ६० रुपये किलो अशा ‘फिक्स रेटने विकल्या जाऊ लागल्या आहेत.

घाऊक बाजारातील भाज्यांचे दर आणि किरकोळीचे दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे, अशी कबुली एपीएमसीच्या भाजी बाजारातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. घाऊक बाजारात हमाली, बाजार फी, वाहतूक खर्च तसेच मालाच्या नासाडीचे प्रमाण लक्षात घेतले तरी २२ रुपये किलो या दराने विकला जाणारा टॉमेटो किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपयांपर्यंत मिळायला हवा. मात्र, काही बाजारांमध्ये टॉमेटोची विक्री ५० रुपयांनी सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने भाज्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एपीएमसीच्या वाशी येथील घाऊक बाजारात भाज्यांनी भरलेल्या ३५० ते ४०० गाडय़ा येत असून नेहमीपेक्षा हे प्रमाण तब्बल ८० ते १०० गाडय़ांनी कमी आहे.
– शंकर पिंगळे, एपीएमसीचे संचालक.