अत्यंत मंदगतीने चालणारे संकेतस्थळ, अर्ज भरण्याकरिता मुळातच नेमून देण्यात आलेली अल्प मुदत यामुळे मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांकरिता विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरून देताना यंदा महाविद्यालयांची चांगलीच दमछाक होते आहे.
या वर्षी परीक्षांचे निकाल रखडल्याने पुढील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियाही लांबली होती. त्यातच एरवी ज्या परीक्षांचे अर्ज ऑक्टोबरमध्ये भरून घेतले जायचे ते सप्टेंबरमध्येच भरून घेण्यास परीक्षा विभागाने सुरुवात केल्याने महाविद्यालयांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी तर प्रवेश अर्जाबरोबरच विद्यार्थी परीक्षांचेही अर्ज भरत आहेत. पदव्युत्तर परीक्षांच्या बाबतीत तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याइतपतही वेळ महाविद्यालयांना मिळालेला नाही. ९० दिवसांचा अभ्यास अवघ्या २५ ते ३० दिवसांत पूर्ण करावा लागणार असल्याने प्राध्यापकांचीही धावपळ उडाली आहे. आता परीक्षा अर्ज ऑनलाइन भरतानाही महाविद्यालयांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.
विद्यापीठाने एमएस्सी, एमकॉम, एमए आदी पदव्युत्तर परीक्षांचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घ्यायचे आहेत. मात्र अर्ज भरण्याकरिता अवघ्या दोन ते तीन दिवसांचीच मुदत देण्यात आल्याने महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे.
महाविद्यालयांना एमकेसीएलच्या प्रणालीच्या माध्यमातून हे अर्ज भरून द्यायचे आहेत, मात्र ही प्रणाली इतक्या मंदगतीने चालते आहे की अर्ज डाऊनलोड करून घेतानाच त्यांची दमछाक होते आहे. त्यात पुन्हा अर्ज भरून घेण्याकरिता अवघे तीन दिवस देण्यात आले आहेत. अन्यथा विलंब आणि अतिविलंब शुल्कासह अर्ज भरा फर्मावण्यात     पान १ वरून आले आहे. मुळात गणेशोत्सव काळात विद्यार्थी महाविद्यालयात फिरकतही नाहीत. त्यांना महाविद्यालयात बोलावून अर्ज भरून घेण्यातच महाविद्यालयांना रक्त  आटवावे लागते आहे. त्यातही काही महाविद्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत कार्यालयात बसवून परीक्षा अर्ज भरून घेण्याचे काम पूर्ण करवून घेतले. परंतु मुंबईपासून लांब असलेल्या महाविद्यालयांना हे अर्ज भरून घेऊन पुन्हा दिलेल्या मुदतीत विद्यापीठांपर्यंत पोहोचविण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास भागात असलेल्या महाविद्यालयांच्या तर अनंत अडचणी असतात. तेथे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची जुळवाजुळव करतानाच दमछाक होते. त्यात ते विलंब (१०० रुपये) किंवा अतिविलंब (५०० रुपये) शुल्क कुठून आणणार, असा प्रश्न एका प्राध्यापकांनी केला.
आम्ही विमानाने यायचे का?
या सर्व प्रकाराला विद्यापीठाचे प्रशासन थेट जबाबदार नसले तरी त्यांनी आमच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांतील महाविद्यालयांनी एका दिवसात हे अर्ज घेऊन विमानाने विद्यापीठात येणे अपेक्षित आहे का, असा प्रश्न एका प्राचार्यानी उद्विग्न होऊन केला. किमान विद्यापीठाने एक केंद्र  नेमून त्या ठिकाणी तरी अर्ज जमा करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.