निवडणुकीतील आश्वासनानुसार राज्यात किमान लहान वाहनांना तरी पथकरातून मुक्त करण्याचा शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरू आहे. लहान वाहनांच्या पथकरमुक्तीमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी जड वाहने आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर २० टक्के अतिरिक्त पथकर लावण्याचे प्रस्तावित आहे. त्या संदर्भातील नवे पथकर धोरण लवकरच अस्तित्वात येईल, असे सूतोवाच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
मार्च-एप्रिलमध्ये पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १२ टोलनाके बंद करण्याचे आणि ५३ टोलनाक्यांवर लहान वाहने, एसटी व स्कूल बसना पथकरातून पूर्णपणे सूट देण्याचा निर्णय जाहीर केला. ३१ मेच्या मध्यरात्रीपासून म्हणजे १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आता राज्यात सर्वच टोलनाक्यांवर लहान वाहनांना पथकरातून मुक्त करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासंबंधातील माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. लहान वाहनांना पूर्णपणे पथकरातून मुक्त करताना होणारा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी मोठय़ा वाहनांवर व मालवाहतूक वाहनांवर २० टक्के अधिकचा कर आकारण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर नव्याने उभारल्या जाणाऱ्या टोलनाक्यावर लहान वाहनांना पथकर लावता येणार नाही, अशी अट घातली जाणार आहे. नव्या पथकर धोरणात या सर्व बाबींचा केला जाणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र अहेड’ या इंग्रजी मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.