ठाणे ग्रामीण पोलिसांची ‘स्मार्ट कार्ड योजना’
रिक्षातून एकटय़ाने प्रवास करणाऱ्या महिलांना अनेकदा संकटांना समोरे जावे लागते. महिलांचा रिक्षातून सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी ‘स्मार्ट कार्ड योजना’ सुरू केली आहे. त्याची सुरुवात मीरा-भाईंदर शहरांपासून होणार आहे.
रिक्षातून प्रवास करताना महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी ठाणे शहर पोलिसांनी रिक्षाचालकांसाठी स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली. ठाणे शहर पोलिसांची ही योजना आता ठाणे ग्रामीण पोलिसांनी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर शहरातील रिक्षा संघटनांना पोलिसांनी विश्वासात घेतले आणि त्यांच्यासाठी एक प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले. सध्या रिक्षाचालकांकडून अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. शहरात जवळपास पाच हजारांहून अधिक रिक्षा व्यवसाय करतात. ही योजना स्वीकारण्यासाठी रिक्षाचालकांवर कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नसली तरी अधिकाधिक रिक्षाचालक स्मार्ट कार्ड बसवून घेण्यास तयार असल्याचे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.