मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सहकार्याने राज्यात एक ‘स्मार्ट औद्योगिक वसाहत’ (एमआयडीसी) आणि पुण्यात सायबर सुरक्षा केंद्र उभारले जाणार आहे. एक खेडे दत्तक घेऊन ‘डिजिटल खेडे’ विकसित केले जाईल. नागपूर स्मार्ट शहर विकसित करण्यासाठी ‘सिस्को’ या नेटवर्किंग क्षेत्रातील अग्रणी कंपनीशी करार झाला असून पायाभूत क्षेत्र, सॉफ्टवेअर, निर्मिती उद्योग आदींशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय आणि करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यात झाले आहेत.
आठवडाभर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ सध्या अमेरिका दौऱ्यावर असून तेथील अग्रगण्य कंपन्या, उद्योगसमूहांनी राज्यातील गुंतवणूक करावी यासाठी भेटीगाठी, चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी सिएटलमधील मायक्रोसॉफ्टच्या सायबर क्राईम सेंटरला भेट देऊन मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी चर्चा केली.
मुंबईत दोन माहिती केंद्रे(डाटा सेंटर्स) उभारल्यानंतर राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष प्रणाली (अ‍ॅप्लिकेशन) तयार केली जाणार आहे.
लघु व मध्यम उद्योगांसाठी तंत्रज्ञान सहकार्य, सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर या भेटीत चर्चा झाली. स्मार्ट औद्योगिक वसाहतीसाठी कंपनीकडून लवकरच जागा ठरविली जाणार आहे. डिजिटल खेडे विकसित करण्यासाठी मेळघाटातील एक आदिवासी खेडे दत्तक घेऊन तेथे आरोग्य सेवा कंपनीकडून पुरविली जाणार आहे.
नागपूरजवळच्या मिहानमध्ये असलेल्या बोईंगच्या प्रकल्पाला गती देण्याबाबत बोईंगच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली. राज्यात नागरी हवाई वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार आखत असलेल्या योजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत माहिती दिली. मेझॉन वेब सव्‍‌र्हिसेसचे महाव्यवस्थापक ज्यो मिनॅरिक यांच्याशी राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरणाविषयी चर्चा केली. कंपनी आणखी गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
डिजिटल इंडिया सप्ताह सुरू असताना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात जाहीर झाली असून त्यातून सुमारे ५० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ब्लॅकस्टोन कंपनीशीही नुकताच यासंबंधी सामंजस्य करार केला.
*राज्यात ४५ हजार कोटींचे नवे प्रकल्प, ५० हजार नवे रोजगार
*हवाई वाहतूक उद्योगांच्या विस्तारासाठी महाराष्ट्र पुढाकार.
*पुण्यात स्मार्ट सायबर सुरक्षा केंद्राची मायक्रोसॉफ्टची योजना.
*आदिवासी भागांत आरोग्य सेवांना प्राधान्य. मेळघाटात पहिला पथदर्शी प्रकल्प.
*डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत अत्याधुनिक सुरक्षा केंद्र उभारण्याबाबत सिमेंटेकसोबत फलदायी चर्चा
*गुगलच्या सहकार्याने शैक्षणिक सुविधा आधुनिकीकरणाबाबत चर्चा
*सिस्कोच्या सहकार्याने नागपूरचा स्मार्टसिटी प्रकल्प.