मुंबईत मॉलमध्ये काम करताना त्यांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले आणि आयुष्यभरासाठी साथीच्या आणाभाका घेतल्या गेल्या. त्यानंतरच्या सहजीवनात त्यांना एक मुलगी  झाली. लग्नाआधीच झालेले मूल, जातीचा अडसर, लग्नासाठी घरच्या मंडळींचा विरोध आणि जातपंचायतीची धमकी असे अग्निदिव्य पार करून त्यांनी प्रेमाच्या आणाभाका सफल केल्या, पण त्यासाठी पोटच्या मुलीचा mu03त्याग करावा लागला. हे शल्य सोबत घेऊनच ते बोहल्यावर चढले आणि संसाराला सुरुवात झाल्यावर मात्र ते पुसण्याचा निर्धार त्यांनी केला. आई-वडील जिवंत असताना अनाथ झालेल्या ‘त्या’ दुर्दैवी मुलीच्या नशिबाचे फेरे बदलले आणि ती नुकतीच आपल्या आईच्या कुशीत विसावली..
एखाद्या चित्रपटात शोभेल, अशी ही कहाणी. जातपंचायतीच्या धाकाने आणि आंतरजातीय विवाहासाठी विरोध असल्याने कोणते टोक गाठले जाते, त्याचे हे उदाहरण आहे. विवाहापूर्वी झालेले मूल हा कलंक दूर करण्यासाठी आईवडिलांनी मुलीचा त्याग केला आणि आता त्यांनीच तिला पुन्हा परत स्वीकारल्याचे हे दुर्मीळ उदाहरण असल्याचे संस्थेच्या सल्लागारांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. (कुटुंबाची ओळख पटू नये, यासाठी संबंधितांची खरी नावे बदलली आहेत.) रत्नागिरी जिल्ह्य़ातील अक्षय मुंबईतील एका मॉलमध्ये कामाला आहे. त्याची तेथे चित्राशी ओळख झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर चित्राला मुलगी झाली. अक्षय आणि चित्रा वेगवेगळ्या जातीचे आहेत. उघडपणे विवाह न करता मूल झाल्याने दोघांच्याही घरच्यांचा विरोध होताच, पण जातपंचायतीने तर थेट वाळीत टाकण्याची धमकी दिली. दोघेही वेगळ्या जातीतील असल्याने आणखीही अडचणी होत्या. बराच खल झाल्यावर उभयपक्षी विवाहास संमती दिली गेली, पण तो होण्याआधी मुलीचा ‘कलंक’ दूर करण्याची अट होती. त्यामुळे अक्षय व चित्राने आपली मुलगी मुंबईतील दत्तकविधानासाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या हवाली केली. संस्थेने दोघांकडूनही मुलीवरील हक्क सोडल्याचे कायदेशीर सोपस्कार तीन महिन्यांपूर्वी केले.
पण आता त्यांना आपली मुलगी परत हवी, असे वाटू लागले. संस्थेने त्या मुलीला दत्तकविधान होईपर्यंत संगोपनासाठी एका कुटुंबातील आईच्या हवाली केले होते. पुन्हा पुन्हा चर्चा झाल्या. बालकल्याण समितीची मान्यता घेण्यात आली आणि संस्थेने त्या मुलीला पुन्हा आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या हवाली केले. संगोपन करण्यासाठी ज्या मातेच्या हवाली त्या मुलीला केले होते, तिचे मन एवढे मोठे की तिला दिलेली बक्षिसीही तिने नाकारली. आपले त्या चिमुकलीवर प्रेम आहे, त्याची किंमत पैशांमध्ये होणार नाही..असे सांगणारी ती संगोपन करणारी आई. अन् जातपंचायतीचा धाक अन् वाळीत टाकण्याच्या धमकीमुळे हतबल झालेले जोडपे..दुर्दैवाच्या फेऱ्यात ‘कलंक’ म्हणून अडकलेल्या चिमुकलीची मात्र सुटका झाली अन् ती पुन्हा आपल्या हक्काच्या घरी गेली.
-उमाकांत देशपांडे