भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती व महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त  राज्यात हे संपूर्ण वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका समारंभात केली.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने यशंवतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्यमंत्र्यांनी समता व समरसता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही दिली. समारंभाला सामजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रधान सचिव उज्जवल उके, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आदी नेते उपस्थित होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सकपाळ, ज्येष्ठ संगितकार प्रभाकर धाकडे, दलित उद्योजक मिलिंद कांबळे, यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार तसेच ५१ अन्य व्यक्ती व १० संस्थांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वंचितांना सामथ्र्य, शब्द आणि संघर्ष वृत्ती देणाऱ्या बाबासाहेबांच्या नावाने ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी समाजात समता व रमरसता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. समता व समरसता ही केवळ भाषणातून येत नाही, तर त्यासाठी कृती करावे लागते. महाराष्ट्र सरकार त्याकरिता कटीबद्ध आहे, असे ते म्हणावे. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ जयंती व महात्मा फुले यांची पुण्यतिथी एकत्रितपणे राज्यात सामाजित समता व समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. त्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लंडनमधील घरासाठी केंद्राची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर खरेदी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. परंतु आता हे घर खरेदी करण्याची केंद्रातील भाजप सरकारनेही तयारी केली आहे. केंद्राने तसे राज्य सरकारला पत्र पाठविले आहे. बघु या काय करायचे ते परंतु ते घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.