डोंबिवलीतील तरुण भावेश नकाते या तरुणाच्या अपघाती मृत्यूबाबत गेल्या दोन दिवसांपासून विविध समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
रेल्वेतील जीवघेणी गर्दी ते या घटनेचे चित्रीकरण करण्याबाबतचे निषेधाचे सूर त्यातून उमटले आहेत. शुक्रवारी डोंबिवली येथे राहणाऱ्या भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाला गर्दीने खच्चून भरलेल्या गाडीत शिरणे अशक्य झाल्याने त्याचा हात निसटून तो धावत्या उपनगरी गाडीतून खाली पडला. यानंतर हे चित्रीकरण सगळीकडे पसरल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.
‘रेल्वेतील जीवघेण्या गैरसोयींचा जाहीर निषेध’ सुखद-सुरक्षित प्रवास हा आपला हक्क. हक्क मिळवण्यासाठी एकत्र या. ‘किती ‘भावेश’चे आणखी बळी जाणार? ‘बस.अजून रेल्वे बळी नको. हीच वेळ आहे. प्रशासनाला जागे करण्याची..१ डिसेंबर रोजी मंगळवारी ‘काळ्या फिती’ लावून सर्व प्रवाशांनी एकत्र येऊन निषेध करू या.’ या अशा अनेक संदेशांचा समावेश समाजमाध्यमांवर होता.

समितीची स्थापना
उपनगरीय रेल्वे मार्गांवर अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता व शुक्रवारी भावेश नकातेच्या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी समिती स्थापन करण्याचे सोमवारी आदेश दिले. यात रेल्वे अधिकारी, राज्य सरकारचे अधिकारी, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी आणि समाजिक संघटनाचे सदस्य असणार आहेत. याशिवाय सामन्य प्रवाशांनाही यात सहभागी होता येणार आहे. याचा अहवाल महिन्याभरात रेल्वे मंत्रालयात सादर केला जाणार आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी यावेळी सांगितले.

भावेशला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि रेल्वेच्या गैरसोयींचा निषेध करण्यासाठी प्रवाशांना १ डिसेंबर रोजी रेल्वे स्थानकांवर एकत्रित जमण्याचे आवाहन समाजमाध्यमांतून केले जात आहे.