मोठा गाजावाजा करून सुरू केलेला प्रकल्प पालिकेच्या अनास्थेमुळे वर्षभरातच बंद

घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी मुंबईतील निवासी सोसायटय़ांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महापालिकेच्या दिव्याखाली मात्र अंधार आहे. गेल्या वर्षी मोठय़ा गाजावाजात उद्घाटन केलेला वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील पहिला बायोगॅस प्रकल्प प्रशासनाच्या अनास्थेमुळे वर्षभरातच बंद पडला आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांना नियमाच्या कचाटय़ात पकडणाऱ्या पालिकेचा दुटप्पीपणा या प्रकारावरून दिसून येत आहे.

महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या परळ येथील केईएममध्ये बायोगॅस प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मात्र या कल्पनेची सुरुवात झाली ती भाभा रुग्णालयातील बायोगॅस प्रकल्पापासून. गेल्या वर्षी पालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयात महापालिकेचा पहिला बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला. वांद्रे परिसरातील ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे उद्दीष्ट त्यामागे होते. ‘खार रेसिडेन्स असोसिएशन’कडून देण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी महापालिकेचे आयुक्त अजोय मेहतादेखील उपस्थित होते. एच पश्चिम वॉर्डमध्ये निर्माण होणाऱ्या २०० किलो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता या प्रकल्पात होती. यातून दिवसाला साधारण आठ किलो एलपीजी गॅस तयार होईल, असा दावा करण्यात आला होता. भाभा रुग्णालयाच्या पीएनजीच्या (पाइप नॅचरल गॅस) वाहिनीशी थेट जोडणी करून हा गॅस स्वयंपाकगृहात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यासाठी स्वयंपाकगृहातील ओला कचरा क्रशरमध्ये टाकून बारीक केला जातो. त्यानंतर ४० हजार लिटरची साठवण क्षमता असलेल्या टाकीमध्ये गॅस तयार होत असे. या वायूतील सर्व कचरा बाजूला काढून त्यानंतर त्याचा स्वयंपाकासाठी वापर करण्याची कल्पना होती. या प्रकल्पामध्ये फक्त स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याने प्लास्टिक तसेच कागद या ओल्या कचऱ्यातून प्लाण्टमध्ये जाणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक होते. यासाठी रुग्णालयाच्या स्वयंपाकघरातून प्लास्टिक तसेच कागदविरहित कचरा टाकला जाईल, याची व्यवस्था करण्यात आली. मात्र मोठय़ा गाजावाजात सुरू झालेला हा प्रकल्प १५ दिवसच उत्तम चालला. त्यानंतर वांद्रे परिसरातून ओला कचरा वेगळा येण्याचे प्रमाण कमी झाले. दोन महिन्यांपूर्वी या प्रकल्पाची काही दुरुस्ती करण्यात आली. मात्र कचराच टाकला जात नसल्याने हा प्रकल्प यशस्वी होणे कठीण आहे, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

महापालिकेला स्वत:चा प्रकल्प नीट सुरू ठेवता येत नसताना सर्वसामान्यांना कचरा व्यवस्थापनासाठी दंड लावणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. गेले अनेक महिने वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील बायोगॅस प्रकल्प बंद पडला आहे. महापालिका अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे दणक्यात उद्घाटन करते, मात्र हे प्रकल्प पुढे सुरू राहतात का, ते पाहिले जात नाही. त्यापेक्षा काही प्रकल्पच हाती घेऊन ते नीट चालवण्याची खटपट पालिकेने करायला हवी.

असिफ झकेरिया, काँग्रेस नगरसेवक

रुग्णालयामधील प्रकल्प व्यवस्थित सुरू असून काहीच समस्या नाही. त्यातून निर्माण होणारा गॅस स्वयंपाकगृहासाठी नियमित वापरला जातो.

डॉ. प्रदीप जाधव, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, भाभा रुग्णालय