निर्मलनगर पोलिसांनी एका हत्येप्रकरणात माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मुलाला अटक केली आहे. मयुरेश शिंदे असे त्याचे नाव आहे.
निर्मलनगरच्या म्हाडा कॉलनी शेजारील पाण्याच्या टाकीवर १ जानेवारी रोजी जब्बार शेख (४२) याचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी मयुरेश शिंदे याला अटक केली आहे. मयुरेश माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुदाम िशदे यांचा मुलगा आहे. त्याच्यावर निर्मलनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद आहे. १ जानेवारी रोजी मयुरेश पाण्याच्या टाकीवर झोपायला गेला होता. तेव्हा त्याचा जब्बारबरोबर झोपण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यातून झालेल्या भांडणातून मयुरेशने पेव्हर ब्लॉक टाकून जब्बारची हत्या केली. या घटनेनंतर मयुरेश सोलापूरला पळून गेला होता. या हत्येमागे मयुरेशचा संबंध असल्याचे समजताच पोलीस सोलापूरला गेले. तेथूनही त्याने पळ काढला होता. तो पुन्हा सोलापुरला येताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मयुरेशची निर्मलनगर भागात दहशत होती. त्याच्यावर खुद्द वडिलांच्या कार्यालयातच चोरी केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.