खासदार मुरली देवरा यांच्या अंत्यदर्शनासाठी सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांक गांधी छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळील मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या कार्यालयात पोहोचल्या आणि ‘मुरली देवरा अमर रहे’च्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. मात्र काही क्षणातच घोषणाबाजी बंद झाली आणि मुरली देवरा यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची सोनिया दर्शनासाठी धडपड सुरू झाली आणि एकच गोंधळ उडाला. अस्ताव्यस्त झालेल्या खुच्र्यावर चढून काँग्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काही नेतेही सोनिया दर्शनात दंग झाले होते.
मुरली देवरा यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून पेडर रोड येथील ‘रामालय’मधील निवासस्थानात राजकीय नेते, उद्यागपती, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी १.४५ च्या सुमारास मुरली देवरा यांचे पार्थिव मुंबई विभागीय काँग्रेस समितीच्या कार्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत जमलेल्या सर्वानी मुरली देवरा यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सुरू झाली प्रतीक्षा सोनिया गांधी यांची. मुरली देवरा यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सोनिया, राहुल, प्रियांका यांच्या आगमनाबाबत चर्चा सुरू झाली. अचानक ३.३० च्या सुमारास पोलीस सतर्क झाले आणि कार्यकर्त्यांना सोनिया आगमनाची चाहुल लागली. कार्यकर्ते टाचा उंचावून प्रवेशद्वाराकडे एकटक पाहात होते आणि सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी यांचे आगमन झाले. ‘मुरली देवरा अमर रहे’च्या घोषणांनी पुन्हा एकदा परिसर दणदणून गेला आणि त्यानंतर सोनिया, राहुल, प्रियांका दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. खुच्र्यावर आसनस्थ असलेले कार्यकर्ते उभे राहिले आणि एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मागच्या कार्यकर्त्यांना सोनिया दर्शन होत नसल्याने एकमेकांमध्ये हमरातुमरी सुरू झाली. खुच्र्या अस्ताव्यस्त झाल्या. त्यातच कार्य कार्यकर्त्यांनी खुर्चीवर उभे राहून सोनिया, राहुल आणि प्रियांका यांची आपल्या मोबाइलवर छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या या पवित्र्यामुळे पोलिसांचाही गोंधळ उडाला.