दूरसंचार सचिवांची माहिती

मोबाइलची चांगली रेंज उपलब्ध करून मुंबई कॉल ड्रॉपमुक्त करण्यासाठी शहरात दिल्लीप्रमाणेच १०० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यानंतर मुंबईतील कॉल ड्रॉपची समस्या दूर होण्याची शक्यता दूरसंचार सचिव जे. एस. दीपक यांनी व्यक्त केली.

देशातील महत्त्वाच्या शहरांमधील मोबाइल रेंजचा आढावा घेण्यासाठी दूरसंचार विभागातर्फे अनेकदा विविध पातळय़ांवर चाचणी घेण्यात आली होती. यानुसार शहरात मोठय़ा प्रमाणावर कॉल ड्रॉप आणि रेंज मिळण्याची समस्या असल्याचे समोर आले. याच्या कारणांचा मागोवा घेतला असता मोबाइल वापरकर्त्यांच्या तुलनेत मनोऱ्यांची संख्या कमी पडत असल्याचे समोर आले. यामुळे मोबाइल मनोरे बसविण्यात नेमक्या काय अडचणी येतात हे जाणून घेत दिल्लीमध्ये दूरसंचार विभाग, दूरसंचार कंपन्या यांनी एकत्रित येऊन १०० दिवसांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम सुरू असला तरी त्यामुळे दिल्लीतील मोबाइलधारक यामुळे समाधानी असल्याचे दीपक यांनी स्पष्ट केले.

ध्वनिलहरींचा लिलाव नवरात्रात

दूरसंचार विभागातर्फे २९ सप्टेंबर रोजी हाणारा ध्वनिलहरींचा लिलाव नवरात्रात होणार असल्याचे दीपक यांनी स्पष्ट केले. अनेक दूरसंचार कंपन्यांनी हा लिलाव नवरात्रात करावा, अशी विनंती केली त्यानुसार हा लिलाव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार असल्याचे दीपक म्हणाले.