प्रत्येक शहराची ओळख असते आणि तशी ती मुंबईचीही आहेच. घडय़ाळाच्या काटय़ावर चालणारे शहर म्हटले जाते मुंबईला; पण मध्यरात्रीला घडय़ाळाच्या काटय़ांचा आवाज ऐकू येईल, इतपत शांतता मिळणेही कठीणच. त्यामुळे खरे तर मुंबईला गोंगाटाचे शहर असा किताब मिळायला हवा. त्या दृष्टीने शहराची कोणीही फारसे न करता किंवा खरे तर काही न केल्यानेच प्रगती झालीय. हवेच्या प्रदूषणाबाबत दिल्ली आणि आवाजाच्या प्रदूषणात मुंबईने गेली काही वष्रे पहिला क्रमांक सोडलेला नाही; पण अर्थातच सामान्यांच्या कानातून मेंदूपर्यंत जाऊन त्याला झिणझिण्या आणणाऱ्या आवाजाबाबत सरकारी यंत्रणांनी कानावर हात ठेवले आहेत.

ध्वनिप्रदूषण नियमानुसार शहराचे निवासी क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र असे चार विभाग करण्यात आले. रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळ, न्यायालयांपासून १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे. आतापर्यंत शहरात १५३७ ठिकाणांची शांतता क्षेत्र म्हणून नोंद झाली आहे. त्यातील पूर्व उपनगरात ५४०, पश्चिमेकडे ५२४, तर दक्षिण भागात ४५३ आहेत. कुर्ला येथे सर्वाधिक २६८, तर सी वॉर्डमध्ये सर्वात कमी १२ शांतता क्षेत्र आहेत. शांतता क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री १० या वेळेत ५० (ए) डेसिबल, तर रात्री ४० (ए) डेसिबल, तर निवासी क्षेत्रात सकाळी ५५(ए) डेसिबल, तर रात्री ४५ (ए) डेसिबलची मर्यादा आहे. यातील ए म्हणजे मानवी कानांनुसार केलेली आवाजाची वर्गवारी.

भूकंप जसा रिश्टर स्केलवर मोजला जातो तसा आवाज डेसिबल पातळीत मोजला जातो. डेसिबल म्हणजे सेंटिमीटर किंवा लिटरप्रमाणे सरळ रेषेत वाढत जाणारे मापन नाही. हे लॉगरेथमिक एकक आहेत. म्हणजे आवाज आणि मानवी ग्रहणक्षमता यातील गुणोत्तर. उदाहरण द्यायचे झाले तर वीस आणि तीस मीटरमध्ये दहा मीटरचा फरक असतो आणि नव्वद व शंभर मीटरमध्येही दहा मीटरचाच फरक असतो. आवाजाच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. ४० डेसिबलपेक्षा ५० डेसिबलचा आवाज दहापट असतो. ५० पेक्षा ६० डेसिबलचा आवाज दहा पट तीव्रतेचा होतो. त्यामुळे ध्वनिनियमांच्या मर्यादेच्या तुलनेत काही डेसिबल जास्त असलेला आवाजही खूप अधिक त्रासदायक ठरतो.

ध्वनिप्रदूषणाचे नियम २००० मध्ये केंद्र पातळीवर लागू झाले. मात्र मुळात आवाज किती आहे हेच कळले नाही तर तो कमी कसा करणार? त्यामुळे मुंबईतील आवाजाची नोंद (नॉइझ मॅिपग) करण्यात यावी, असा तगादा सामाजिक संस्थांनी लावला. मात्र उंच इमारती, नालेसफाई, रस्तेकाम या कोटय़वधी रुपयांच्या प्रकल्पात डोके घालून बसलेल्या महानगरपालिकेला काही लाख रुपये खर्चून बौद्धिक स्तरावरील या कामात फारसा रस असण्याचे कारण नव्हते. अखेर न्यायालयीन दणका म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकल्प आणण्यासाठी दिखावा करण्याच्या निमित्ताने का होईना, पण दोन वर्षांपूर्वी अखेर ध्वनी नोंदी घेण्याच्या निविदा काढल्या गेल्या. त्यानंतरही फार वेगाने काही घडले नाही. सर्व वॉर्डमध्ये ध्वनिमापन यंत्रणा लावून त्यातून नोंदी घेऊन त्याचा अभ्यास करण्याचे शिवधनुष्य पालिकेला पेलवलेले नाही. शहरात बाराशे ठिकाणी दिवसा, रात्री व सुट्टीच्या दिवशी आवाजाची नोंद घेण्याचे काम अद्यापही अर्धवट आहे. दुसरीकडे हरित लवादाकडेही ध्वनिप्रदूषणावर याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र फेब्रुवारीत दोन महिन्यांची मुदत दिल्यावरही आतापर्यंत पालिकेने कासवगती वाढवलेली नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही फार काही पडलेले नाही. दिवाळीत राज्यातील वेगवेगळ्या शहरांत ध्वनिप्रदूषणाचे मापन झाले तेव्हा रात्रीच्या वेळी फटाक्यांच्या आवाजापेक्षा दिवसाचे वाहन, बांधकाम यांचे आवाज अधिक असल्याचे समोर आले. यावर मंडळाकडून विस्तृत अहवाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र असा अहवाल अद्याप तरी जाहीर झाल्याचे दिसलेले नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१४ या चार वर्षांत प्रमुख शहरांमधील ध्वनिनोंदीची पाहणी केली तेव्हा मुंबईतील सर्व ठिकाणी एकदाही ध्वनिमर्यादेचे पालन झालेले दिसले नाही. मात्र यानंतरही ठोस उपाय करण्यापेक्षा जनजागृती करा एवढाच सल्ला मंडळाकडून दिला जात आहे.

आता हे वाचतानाही तुम्हाला आजूबाजूचे आवाज ऐकू येत असतील. वाहनांचे, भोंग्यांचे, मुलांच्या ओरडण्याचे आणि इतरही बरेच. आवाजाची आपल्याला एवढी सवय झालीय की, काही वेळा त्यांचे वेगळे अस्तित्वही जाणवत नाही. उलट शांतता पसरली की उगीच काही तरी विपरीत घडल्याचे जाणवते आणि त्यामुळेच मानसिक अस्थर्यापासून बहिरेपणापर्यंत घेऊन जाणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत आपण उदासीन आहोत. या उदासीनतेचा फायदा सरकारही घेत आहे.

  • निवासी क्षेत्रातील आवाजाची मर्यादा – ५५ डेसिबल
  • टाचणी पडणे – १० डेसिबल
  • पानांचे सळसळणे – २० डेसिबल
  • हलक्या आवाजात कुजबुजणे – ३० डेसिबल
  • पायरव – ४० डेसिबल
  • पावसाची हलकी सर – ५० डेसिबल
  • सामान्य आवाजातील संभाषण – ६० डेसिबल
  • वाहतूक – ७० डेसिबल
  • घडय़ाळाचा गजर – ८० डेसिबल
  • ध्वनिक्षेपक – ११० डेसिबल
  • फटाके – १३० डेसिबल

prajakta.kasale@expressindia.com